छत्तीसगडमध्ये 34 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; 27 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश, 84 लाखांचं होतं बक्षीस

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील 34 नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यात 27 पुरुषांचा आणि 7 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 26 नक्षलवादी असे आहेत ज्यांच्यावर पोलिसांनी 84 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती बिजापूर पोलिसांनी दिली. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण सब-झोनल ब्युरोशी संबंधित नक्षलवाद्यांनी मंगळवारी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. यात दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी, तेलंगणा राज्य समिती आणि ‘आंध्र-ओडिशा बॉर्डर’ विभागाशी संबंधित सदस्यांचा समावेश आहे. यात 8 लाखांचे बक्षीस असलेल्या डिव्हिजन कमिटी मेंबर केरलापाल एरिया कमिटीच्या सदस्याचाही समावेश आहे. तसेच पीपल्स लिबरेशन गनिमी आर्मीचे सदस्य, तसेच एरिया कमिटी मेंबर्स, प्लाटून लीडर्स, मिलिशिया कमांडर आणि नक्षलवाद्यांच्या आघाड्यांवरील संघटनांच्या अध्यक्षांचाही आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, आत्मसमर्पण केलेल्यांना राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. विजापूरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी उर्वरित नक्षलवाद्यांनाही हिंसेचा मार्ग सोडून शरण येण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, जानेवारी 2024 पासून विजापूर जिल्ह्यात 824 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.