देशातील पाच जणांची कंबोडियात किडनी काढली, पीडित शेतकरी रोशन कुडे यांची धक्कादायक माहिती

चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी आज माध्यमांसमोर संपूर्ण परिस्थिती मांडली. देशातील पाच जणांना कंबोडियात नेण्यात आले आणि त्यांची किडनी काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात राजस्थान, हरियाणा, पंजाब, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांचा समावेश होता. त्यांचीही परिस्थिती दयनीय असल्याने त्यांनी किडन्या विकल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक येथील एक व्यक्ती देखील आपल्या सोबत होता. त्याने आधी किडनी देण्यास होकार दिला, मात्र कोलकाता विमानतळावरून त्याने माघार घेतली आणि गावी परतला, अशी माहिती रोशन यांनी दिली. कंबोडियात मोठा स्कॅम चालत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुग्ध व्यवसायासाठी आपण कर्ज घेतले होते. पण गायी मरण पावल्या आणि नुकसान झाल्याने कर्जात बुडत गेल्याचेही त्यांनी सांगितले.