नगर परिषदेपाठोपाठ झेडपीतही थोरवेंना कर्जतकरांनी झिडकारले; जिल्हा परिषदेत भोपळा, पंचायत समितीत दोन जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत नगर परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोबतीने झेडपीतही आपला प्रभाव कायम राखला. परिवर्तन विकास आघाडीने शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंच्या हुकूमशाहीला दणका दिला. शिंदे गटाला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. पंचायत समितीच्या तर अवघ्या दोन जागा मिळाल्या. या निकालामुळे नगर परिषदेपाठोपाठ झेडपीतही थोरवेंना कर्जतकरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा परिषद निवडणुकीत कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहापैकी एकही जागा शिंदे गटाला मिळाली नाही, तर पंचायत समितीच्या १२ जागांपैकी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. हे थोरवे यांचे अपयश आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील सत्तासमीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नितीन सावंत आणि अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या परिवर्तन आघाडीला मतदारांनी स्पष्ट कौल दिला. परिवर्तन विकास आघाडीने रणनीती प्रभावीपणे राबवल्याचे या निकालातून अधोरेखित झाले. दुसरीकडे या पराभवानंतर आमदार थोरवे यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शिंदे गटाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी तटकरेंची ‘फिल्डिंग’, भाजप-अजित पवार गटाचे संख्याबळ ‘जुळले’

दे धक्का…

कर्जतच्या मोठे वेणगाव पंचायत समिती गणात शिवसेनेच्या चित्रा ठाकरे यांनी ५१०८ मते मिळवत आमदार महेंद्र थोरवे यांची सून श्वेता थोरवे यांचा पराभव केला. स्वतःच्या सुनेला विजय मिळवून देता न आल्याने थोरवेंच्या राजकारणाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.