
वसतिगृहाच्या थकीत शुल्कासाठी त्रास दिल्यामुळे हडको येथील पद्मश्री शामरावजी कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील बीएचएमएस द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आकांक्षा गायकवाड या 25 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी हॉस्टेलचालक तथा राष्ट्रवादीचा नेता जीवन पाटील घोगरे याच्याविरुद्ध अँट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांची असुरक्षितता आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे
नवीन नांदेडातील वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड ही विद्यार्थिनी हडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला बीएचएमएसया द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती हाडको येथील जीवन घोगरेच्या घरी असलेल्या हॉस्टेलवर राहत होती. या हॉस्टेलसाठी तिच्याकडून दरमहा अडीच हजार रुपये घेतले जात होते. गेल्या एक वर्षापासून आकांक्षा गायकवाड त्या वसतिगृहात राहत होती. 6 मार्च रोजी आकांक्षा ही हॉस्टेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पालकांनी मात्र या प्रकरणात हॉस्टेल चालकाविरुद्ध वेगवेगळे आरोप केले आहेत. आकांक्षाने स्वतःहून फाशी घेतल्याचे दिसत नव्हते. आपली मुलगी फाशी घेणारी नव्हती तर ती परिस्थिती सोबत लढून शिक्षण घेणारी होती, असा दावाही पालकांनी केला आहे. घटनेच्या ठिकाणी आकांक्षाच्या पायाला लागेल एवढ्या अंतरावर बेड होता. त्यामुळे मुलीने फाशी घेतल्याचा बनाव कुणीतरी केला असल्याचेही पालकाने तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून आकांक्षाने वसतिगृहाची फीस दिली नव्हती. त्यामुळे वसतिगृहाचा मालक जीवन घोगरेकडून तिला पैसे भर म्हणून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच आकांक्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या पित्याने केला आहे. अनुसूचित जाती-जमातीची मुलगी असल्याचे माहित असूनही जीवन घोगरेने त्रास देऊन आकांक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते जीवन घोगरेविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हॉस्टेल चालविले जात आहेत. यामध्ये राजकीय मंडळीसह व्यावसायिकही मोठ्या प्रमाणात उतरले आहेत. त्याचवेळी खाजगी अभ्यासिकेच्या नावानेही विद्यार्थ्यांची मोठी लूट होत आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. एकाच खोलीत अथवा हॉलमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी ठेवले जात आहेत. त्यात विद्यार्थिनींची कुचंबना ही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. खाजगी हॉस्टेलमध्ये असलेल्या मुलींना मानसिक त्रास दिला जात आहे. त्यात शुल्कासह इतर बाबींचाही समावेश असल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. नांदेड जिल्हाभरात असलेल्या हॉस्टेलमधील सुविधांची पाहणी प्रशासनाने करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.




























































