
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून वानवडा शिवारात मध्यरात्री चारचाकी कारला भीषण आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना एसी लातूर अंतर्गत येणाऱ्या औसा तालुक्यात घडली असून संबंधित चारचाकी गाडी स्कोडा कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास वानवडा शिवारातील एका निर्जन ठिकाणी अचानक कारने पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. गाडीत असलेला चालक बाहेर पडू न शकल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. चालकाचे वय अंदाजे 35 वर्षे असल्याचे सांगितले जात असून मृतदेह पूर्णतः जळाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. कारला अपघातामुळे आग लागली की ही आग मुद्दाम लावण्यात आली याबाबत सध्या स्पष्टता नाही. मात्र घटनास्थळाची परिस्थिती आणि गाडीची अवस्था पाहता घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पोलीस चालकाची ओळख पटवण्यासाठी वाहन क्रमांक इंजिन क्रमांक आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि मागील वाद यांचा देखील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिस तपासात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



























































