
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजपवर जोरदार निशाणा साधला.
‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्या वर्षातील ३६५ दिवस याच ठिकाणी राहतात आणि ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांनी भवानीपूरच्या जनतेला शुभेच्छा देत राज्यातील सर्व २९४ जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल आणि भाजप आपल्या मिशनमध्ये अपयशी ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी मतदार यादीतील घोळावरून गंभीर आरोप केले. अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, १.२ कोटी मतदारांपैकी केवळ ३२ लाख नावेच शिल्लक राहिली आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यामुळेच हे घडले असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ५८ लाख मतदारांची नावे कापली गेली असून हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मृत किंवा दुबार मतदारांची नावे काढण्याला विरोध नाही, मात्र विनाकारण नावे काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.
ममता बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, २७ लाखांहून अधिक मतदार सध्या विचाराधीन (Under Adjudication) श्रेणीत आहेत आणि त्यांची नावे अद्याप मतदार यादीत समाविष्ट केलेली नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत त्यांनी म्हटले की, हे सर्व लोक खरे मतदार आहेत आणि ज्यांची नावे वगळली गेली आहेत, ते ट्रिब्यूनलमध्ये अपील करतील. मतदारांच्या हक्कांसाठी त्यांचा पक्ष पूर्णपणे सक्रिय असून आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.



























































