
नगर शहरात पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. बालिकाश्रम रोड परिसरात एका भरधाव इनोवा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार रिक्षांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास बालिकाश्रम रोड परिसरात घडली. रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा घराबाहेर लावल्या होत्या. एका भरधाव वेगाने आलेल्या इनोवा कारने नियंत्रण सुटल्यामुळे या चारही रिक्षांना एकामागून एक जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, काही रिक्षांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी बाहेर धाव घेतली. रिक्षाचालक जवळच असलेल्या घरात झोपलेले असल्याने ते या अपघातातून बालंबाल बचावले.
पोलिसांत गुन्हा दाखल
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाढत्या वेगामुळे होणारे अपघात चिंतेचा विषय बनले असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेमध्ये चार चाकी चा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये आढळून आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



























































