
बेकायदा बांधकामांमुळे बदलापूर पालिका कार्यक्षेत्रात बजबजपुरी झाली आहे. अखेर न्यायालयाने फटकारल्यानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून बेकायदा बांधकामे तसेच अतिक्रमणांवर हातोडा उगारला आहे. प्रशासनाने चारशेहून अधिक अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणाची यादी प्रसिद्ध केली असून रोज ५० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. आज पहिल्याच दिवशी ५० हून अधिक बांधकामे पाडली.
कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न चर्चेला आला. त्यावरून नगर परिषद प्रशासनाला न्यायालयाने फटकारले. यावेळी शहरात तब्बल ४३८ अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली होती. या बांधकामांची यादी जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने या अधिकृत बांधकामांची अतिक्रमणाची यादी प्रसिद्ध केली. संबंधितांनी ही अनधिकृत बांधकामे हटवावी, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांनंतरही ही बांधकामे हटली नाहीत. त्यामुळे आजपासून नगर परिषद प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली. पालिकेचे दोन टीम आणि पोलिस फौजफाटा घेऊन पालिका रोज पन्नास अनधिकृत बांधकामे तोडणार आहे.
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बदलापूर पूर्व भागातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने तोडली. त्यामध्ये अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी रोड तसेच प्रस्तावित पनवेल रोडवरील अनेक दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर, दुचाकीचे शोरूम, फर्निचर दुकाने आदी पन्नासहून अधिक अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने भुईसपाट करण्यात आली. त्यामुळे अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.


























































