
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा सत्तेत येऊन अवघे 100 दिवस झाले आहेत, परंतु त्यांनी या 100 दिवसांत जे निर्णय घेतले आहे, त्याने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. शंभर दिवस पूर्ण होताच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका घेणे सुरूच ठेवले आहे. ट्रम्प यांनी आता एका नव्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या नव्या कायद्यामुळे अमेरिकेतील ट्रक चालकांना अस्खलित इंग्रजी बोलणे बंधनकारक आहे. यामुळे जवळपास दीड लाख हिंदुस्थानी ट्रक चालकांवर टांगती तलवार आली आहे. इंग्रजी न बोलल्यास ट्रक चालकांना अमेरिकेतून बाहेर हाकलले जाणार आहे. यामुळे अमेरिकेतील दीड लाख हिंदुस्थानी ट्रक चालक बेरोजगार होण्याची भीती वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील ट्रक चालकांना पाठबळ देण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन महिन्यांत ट्रक चालकांनी इंग्रजी बोलणे शिकायला हवे. जो ड्रायव्हर आपली राष्ट्रीय भाषा इंग्रजी पुरेसे वाचू किंवा बोलू शकत नाही आणि रस्त्यांची चिन्हे समजू शकत नाही, तो अमेरिकेत व्यावसायिक मोटार वाहन चालविण्यास अयोग्य आहे, असे अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी म्हटले आहे.
काय आहे आदेश
अमेरिकेच्या ट्रक चालकांसाठी ‘कॉमनसेन्स रुल्स ऑफ द रोड’ नावाचा आदेश आणला आहे. ट्रक चालकांनी त्यांच्या मालकांना आणि ग्राहकांना इंग्रजी भाषेत अभिप्राय देणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक चिन्हे इंग्रजीत वाचता व समजता येणे आवश्यक आहे. वाहतूक सुरक्षा, सीमा गस्त, मालवाहू वजन, अशा अनेक बाबतींत इंग्रजीमध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला पाहिजे, असेही या आदेशात म्हटले आहे.