पुणे शहरात १ हजार ६५७ अनधिकृत मोबाईल टॉवर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध मोबाईल कंपन्यांचे फक्त २३८ अधिकृत टॉवर्स आहेत. उर्वरित तब्बल १ हजार ६५७ मोबाईल टॉवर्स अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या प्रश्नोत्तरामध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी मोबाईल टॉवर्सबाबत विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यातून ही माहिती उघडकीस आली आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध मोबाईल कंपन्यांचे इमारतीच्या छतावर आणि जमिनीवर अनधिकृत मोबाईल टॉवर्स आहेत. अधिकृत मोबाईल टॉवरला परवानगी देण्यासाठी स्क्रुटिनी फी सहाशे रुपये, एकरकमी प्रशासकीय शुल्क ३० हजार रुपये, बांधकाम विकसन शुल्क इमारतीवरील मोबाईल टॉवर बांधकामासाठी शीघ्र सिद्ध गणक (रेडीरेकनर) दराच्या ४० टक्क्यांपैकी ८ टक्केनुसार आकारले जाते. मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर असल्यास ८ टक्केपैकी जागेचा शीघ्र सिद्ध गणक (रेडीरेकनर) दरानुसार आकारले जाते. मोबाईल टॉवरच्या माध्यमातून ७ कोटी २४ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मोबाईल टॉवरच्या मिळकतकराच्या माध्यमातून ३१ कोटी ३६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शहरात केवळ २३८ अधिकृत टॉवर्स आहेत. उर्वरित तब्बल १ हजार ६५७ मोबाईल टॉवर्स अनधिकृत आहेत.