तुकाराम मुंढे यांच्यासह 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारने आज प्रशासनात फार मोठे फेरबदल केले असून 10 सनदी अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिकाऱयांमध्ये दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. गेल्या 20 वर्षांतील मुंढे यांची ही 24 वी बदली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागात बदली झाली होती. आता त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन विभागात केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची बदली मृद आणिजलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली आहे, तर सिंगल यांच्या जागी तुकाराम मुंढे यांना आणण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांची बादली कृषी विभागात सचिव म्हणून झाली आहे.

वसई-विरारमध्ये पृथ्वीराज बी. पी.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लहू माळी, तर दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी माणिक गुरसल यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्य कर, मुंबई विभागाच्या सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली मत्स्य व्यवसाय आयुक्तपदी झाली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे वसई -विरार महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

लोकेश चंद्रा मुख्यमंत्री कार्यालयात

सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची नेमणूक करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिवपद रिक्त झाले होते. कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात (वित्तीय सुधारणा) बदली झाली आहे.