
देशात 2032 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या 12 कोटी 30 लाख इतकी होईल, असा अंदाज इंडिया ‘एनर्जी स्टोरेज अलायन्स आणि कस्टमाईज्ड एनर्जी सोल्युशन’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवण्यात आला. शाश्वत विकासाच्या दिशेने आणि शून्य कार्बन उत्सर्जन ध्येय गाठण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आवश्यक असल्याची गरज अहवालातून अधोरेखित करण्यात आली.
अहवालानुसार, ईव्हीच्या 2030 साली निर्धारित केलेल्या लक्ष्यापैकी 30 टक्के ध्येय गाठल्याचे आले आहे. सार्वजनिक चार्ंजगची पायाभूत सुविधा उपलब्ध होत असल्याने इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ईव्हीचा वापर 80 टक्के, खासगी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी 30 टक्के, व्यावसायिक कारसाठी 70 टक्के आणि इलेक्ट्रिक बससाठी 40 टक्के होईल असा अंदाज आहे.
2024 मध्ये हिंदुस्थानातील ऑन-रोड ईव्ही स्टॉकमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा वाटा 93 टक्क्यांहून अधिक होता.
2024 मध्ये रस्त्यावर सुमारे 2 लाख 20 हजार खासगी इलेक्ट्रिक चारचाकी वाहने धावली. त्यापैकी बहुतेक निवासी भागात बसवलेल्या टाइप-2 एसी चार्जरवर अवलंबून होती.
2024 मध्ये हिंदुस्थानात अंदाजे 3 लाख 20 हजार खासगी टाइप-2 एसी चार्जर होते, त्यापैकी 70 टक्के 3.3 किलोवॅट युनिट्स, 28 टक्के 7.4 किलोवॅट युनिट्स आणि उर्वरित 11-22 किलोवॅट युनिट्स उच्च-क्षमतेचे होते.