मध्य रेल्वेत आले 12 हजार हॉर्स पॉवरचे ताकदवान इंजिन, फ्रान्सच्या अलस्टॉमच्या मदतीने ‘मेक इन इंडिया’निर्मिती

873

शत्रूच्या हृदयात धडकी भरविणारे राफेल देशात गाजत असताना फ्रान्सच्याच अलस्टॉम कंपनीच्या सहकार्याने देशातच तब्बल 12 हजार हॉर्स पॉवर क्षमतेचे मालगाडीचे इंजिन मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाले आहे. इतक्या मोठ्या ताकदीचे इंजिन बनविणारा हिंदुस्थान जगातला सहावा देश असून तर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे असे अत्याधुनिक इंजिन बनविणारा जगातला पहिला देश ठरला आहे.

फ्रान्सच्या अलस्टॉम आणि हिंदुस्थानच्या रेल्वेने मिळून तयार केलेल्या डब्ल्यूएजी -12 या शक्तीशाली 12000 हॉर्स इंजिनामुळे मालवाहतुकीचे सारे संदर्भच बदलणार आहेत. या इंजिनामुळे 100 डब्यांची गाडी खेचणेही शक्य होणार असून सुरूवातीला दर ताशी 100 कि.मी. वेगाने तर नंतर ताशी 120 कि.मी.ने मालगाड्या चालविणे शक्य होऊन रेल्वेच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. बिहारच्या मधेपुरा इलेक्ट्रीक लोको फॅक्टरीत हे इंजिन तयार केले आहे. नागपूर जवळील अजनी येथे अशा 250 इंजिनांचे मेन्टेनन्स करण्यासाठी फेब्रुवारी 2022 पर्यंत कारखाना उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.  हे इंजिन आयजीबीटी तंत्रज्ञान आधारित 3 फेज ड्राईव्ह, नऊ हजार किलोवॅटचे असून यात जीपीएस तंत्रज्ञान असल्याने नियंत्रण कक्षातून बसल्या जागी इंजिनाची सर्व माहिती क्षणार्धात मिळविणे सोपे झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या