
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईकरांचा लटकता प्रवास सुरक्षित करण्यासाठी तब्बल 12 वातानुकूलित लोकल मुंबईला मिळणार आहेत. त्यातील सहा एसी लोकल मध्य रेल्वेला तर सहा लोकल पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत. या बारा एसी लोकल सध्या पश्चिम रेल्वेवर धावत असलेल्या ‘भेल’ अर्थात भारत हेव्ही इलेक्ट्रिक कंपनीच्याच असणार आहेत. या लोकलला अर्धे साध्या लोकलचे डब्बे जोडण्याविषयी रेल्वे मंत्रालयाचे अजूनही तळ्यात-मळ्यात असल्याने मुंबईकरांना एसी लोकलमधून प्रवास करण्यासाठी ‘फर्स्ट क्लास’च्या तिकिटाच्या 1.2 पट जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास ‘थंडा कुल’ पण ‘खिसा नरम’ करणारा ठरणार आहे.
मुंबईत सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलचा प्रयोग म्हणावा तितका यशस्वी ठरलेला नाही. चर्चगेट ते विरार अशा 12 फेऱ्या पश्चिम रेल्वेने सुरू केल्या असल्या तरी त्यातील दोनच फेऱ्या प्रत्यक्षात गर्दीच्या पिकअवरमध्ये धावतात. त्यांनाही पश्चिम रेल्वेच्या गुजराती शेअर मार्केटमधील प्रवाशांची गर्दी असते. एरव्ही पश्चिम रेल्वेच्या सामान्य 12 फेऱ्यांचे नुकसान सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावे लागत आहे.
त्यानंतर अर्धे एसीचे डबे आणि अर्धे साधे डबे अशी सहा सहा डब्यांची मिक्स लोकल चालविण्याचा पर्याय समोर आला. मात्र अशा प्रकारचे सहा डबे जोडण्यासाठी अद्याप हालचाली झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे ‘भेल’ कंपनीने संपूर्ण 12 डब्यांच्या लोकलचाच पर्याय कायम ठेवला आहे. अशा दोन्ही प्रकारचे डबे जोडण्यासाठी बंबार्डिअर अथवा मेधा कंपनीकडे कंत्राट देण्याची बोलणी अद्यापी सुरूच आहेत.
‘भेल’च्या बारा एसी लोकल अशा येणार
- 1ली लोकल पश्चिम रेल्वे,
- 2री लोकल मध्य रेल्वे
- 3री लोकल मध्य रेल्वे,
- 4थी लोकल पश्चिम रेल्वे
- 5वी लोकल पश्चिम रेल्वे,
- 6वी लोकल पश्चिम रेल्वे
- 7वी लोकल मध्य रेल्वे,
- 8वी लोकल मध्य रेल्वे
- 9वी लोकल पश्चिम रेल्वे,
- 10वी लोकल पश्चिम रेल्वे
- 11वी लोकल मध्य रेल्वे,
- 12वी लोकल मध्य रेल्वे
गोरेगाव हार्बर मार्गावर एसी लोकल
मध्य रेल्वे तिच्याकडे येणाऱ्या एसी लोकलसाठी वेळापत्रकात जागा शोधत आहे. या एसी लोकलला गोरेगाव हार्बर मार्गावर चालविण्याचा विचार आहे. कारण पश्चिम रेल्वेचे प्रवाशीच या लोकलचे भाडे सहन करू शकतील, असा विचार यामागे असल्याचे समजते. जर पहिल्याच एसी लोकलला प्रचंड विरोध झाला तर रेल्वे मंत्र्यांच्या जादा पैसे खर्च करणाऱ्यांसाठी चांगली सेवा पुरविण्याच्या प्रयत्नांना धक्का बसेल, असे म्हटले जाते.
मुंबईकरांना तब्बल एक डझन एसी लोकल
मुंबईकरांना तब्बल एक डझन एसी लोकल मिळणार आहेत. त्यातील सहा लोकल मध्य रेल्वेला तर सहा लोकल पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत. या सर्व लोकल ‘भेल’ कंपनीच्या असणार आहेत. दर सहा महिन्यांना एक लोकल या वेगात या लोकल येणार आहेत.
आधी ‘मेधा’च्या एसी लोकलचा नंबर
चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात पश्चिम रेल्वेवर दाखल होणारी दुसरी एसी लोकल बांधताना तिचे विद्युत मोटार व इतर यंत्रणेसाठी ‘भेल’ कंपनीने सुटे पार्ट्स देण्यास उशीर केल्याने या लोकलची विद्युत यंत्रणा हैदराबादच्या ‘मेधा’ कंपनीने तयार केली आहे.






























































