
मिंधेंच्या ठाण्यात तब्बल 124 इमारती बेकायदा असल्याची माहिती महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केली. याची गंभीर दखल घेत या अवैध इमारतींवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
ठाणे पालिकेचे वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी ही माहिती न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाला दिली. बेकायदा बांधकामे शोधण्यासाठी ठाणे पालिका आयुक्तांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीने आतापर्यंत 124 अवैध इमारतींची नोंद केली आहे. पालिकेच्या 9 वॉर्डमधील या इमारती आहेत, असे अॅड. कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.
तक्रार निवारण अधिकारी नेमा
अवैध बांधकामांची बोगस कागदपत्रे दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ठाणे पालिका आयुक्तांनी स्वतंत्र अधिकारी नेमावा. जेणेकरून अशा प्रकरणात वेळेत कारवाई होऊ शकेल, असेही खंडपीठाने नमूद केले. ठाण्यातील हरित पट्टा व पर्यावरण संवेदनशील विभागात अवैध बांधकामे झाली आहेत. त्यावरही कारवाई झाली पाहिजे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
बांधकामाच्या फलकावर क्यूआर कोड
बांधकाम होत असलेल्या ठिकाणी मोठे फलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. या फलकावर क्यूआर कोड असेल. हा कोड स्पॅन केल्यास इमारत बांधकाम परवान्याचा सर्व तपशील मिळेल. याने घर खरेदी करणाऱयांना सर्व माहिती मिळेल. पालिका अधिकारीदेखील हा तपशील योग्य आहे की नाही याची खात्री करू शकतील. हा फलक लावण्याचे परिपत्रक ठाणे पालिकेने जारी केले आहे. सध्या दोन गृहनिर्माण प्रकल्पांचे फलक लावण्यात आले आहेत. अन्य ठिकाणी याची अंमलबजावणी केली जाईल, असे अॅड. पुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.