
सामना प्रतिनिधी । देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांना घरघर लागली असून विद्यार्थ्यांच्या कमी पटसंख्येमुळे शाळा बंद पडू लागल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला तब्बल १३ शाळा बंद पडल्या आहेत. या १३ शाळांमधील २६ शिक्षक अतिरीक्त झाल्याने त्यांना अन्य शाळांमधून सामावून घेण्यात आले आहे. सध्या तालुक्यात आता ३६६ शाळा कार्यान्वित राहील्या आहेत. तसेच बंद पडलेल्या शाळांमधील कमी विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन घेण्यात आले आहे.
इंग्रजीचा वाढता प्रभाव लक्षात घेता मराठी शाळांवर ही मरगळ आली आहे. लहान कुटूंब पध्दती रुजू लागल्यामुळे कुटूंबात एक मूल अशा पध्दतीची कुटूंबरचना वाढीस लागली आहे. यामुळे साहजिकच शाळेमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होवू लागली आहे. आपले एकुलते एक मूल इंग्रजी माध्यमातून शिकावे अशा इच्छेमुळे याचा फटका मराठी शाळांना बसू लागला असून या शाळांमधील पटसंख्या काळजी करण्या एवढी घसरली आहे. तालुक्यात एकेकाळी ४०४ मराठी शाळा कार्यान्वित होत्या. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शाळेचे भवितव्य शासनाने निश्चित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षक नेमणूक व त्यावरच शाळा सुरु अथवा बंद करणे हे धोरण अंमलात आले आहे, असे असतांनाही तालुक्यातील अनेक शाळा आजही ५ ते ९ विद्यार्थी आणि २ शिक्षक अशा अवस्थेत चालवल्या जात आहेत. या शाळा केवळ शिक्षकांसाठीच सुरु ठेवल्याची ओरड जनतेतून होवू लागली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील १३ शाळा चालू शैक्षणिक वर्षात बंद पडल्या. यामध्ये कुडवली बौध्दवाडी, मुचरी उर्दू, उजगांव धनगरवाडी, सोनवडे वरचीवाडी, हक्रवणे, कातुर्डी, तिवरेपवारवाडी, रातांबी, शेंबवणे गोमाणेवाडी, असावे, बामणोली करंडेवाडी, दाभोळे जोयशीवाडी, कोंड्ये नंबर ३ या शाळांचा समावेश आहे. पालकांचा आपल्या पालकांना इंग्रजी माध्यमाकडे घालण्याचा कल वाढत असल्याने गत तीन वर्षात ३३ मराठी शाळा बंद पडल्या आहेत. अजूनही काही प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

































































