बीड जिल्ह्यातून रविवारी 136 स्वॅब तपासणीला; प्रशासनाचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

बीड जिल्ह्यासाठी रविवारचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सामुहिक संक्रमण झाले आहे की नाही याचा निर्णय रविवारच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. रविवारी तब्बल 136 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचेही स्वॅब तपासणीला पाठवले असल्याने प्रशासनाचा जीव टांगणीला लागला आहे.

बीड जिल्ह्यातून रविवारी 136 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी स्वामी रामानंद तिर्थ शासकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात जिल्हा सामान्य रूग्णालयातून 49, सीसीसी बीडमधून 23, स्वाराती अंबाजोगाईतून 18, सीसीसी अंबाजोगाई 11, केज 1, आष्टी 2, गेवराई 4 आणि परळीतून 28 असे एकुण 136 स्वॅब पाठवण्यात आले आहेत. त्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे. हा अहवाल महत्त्वाचा ठरणार असल्याने प्रशासनाचा जीवही टांगणीला लागला आहे.