
शहापूर, कसारा परिसरात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. रुग्णांना प्राथमिक उपचारही मिळत नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. सर्पदंश झालेल्या मुलाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सरकारी अनास्थेमुळे 14 वर्षांचा प्रेम सदगीर या मुलाला हकनाक जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
शहापूर तालुक्यातील पेंढरघोळ येथील प्रेम सदगीर हा मंगळवारी पाच वाजता मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. चेंडू लांब गेल्याने तो आणण्यासाठी गेला आसता त्याला विषारी सापाने दंश केला. दंश झाल्याचे लक्षात येताच लगेच त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी केवळ रक्त तपासणी केली. ड्युटीवरील डॉक्टर नसल्याचे कारण देत एक तास मुलावर कोणतेही उपचार केले नाहीत. उपचाराअभावी बेडवरच त्याचा तडफडत मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर करावे करावी, अशी मागणी प्रेमचे वडील लहानू सदगीर यांनी केली आहे.
वॉर्ड सोडून केबिनमध्ये गप्पांचा फड
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार करावेत यासाठी पालकांनी डॉक्टर व परिचारिका यांना खूप विनंती केली. मात्र कोणीही मुलाकडे लक्ष दिले नाही. वॉर्ड सोडून डॉक्टर व कर्मचारी केबिनमध्ये गप्पा मारत बसले होते. प्रेमची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. प्रशासनाने रुग्ण प्रेम सदगीर याला ठाणे येथे घेऊन जाण्यास सांगितले मात्र त्याचदरम्यान त्याचा तडफडून मृत्यू झाला.