तिसगावातून 1400 किलो गोमांस जप्त

प्रातिनिधिक फोटो

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रविवार पेठेतील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत तीन लाखांहून अधिक किमतीचे 1400 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे आणि जिवंत गोवंशीय जनावरे जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. नासीर मोहम्मद कुरेशी (रा. तिसगाव, पाथर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रविवार पेठेत छापा टाकला. यावेळी नासीर कुरेशी हा जनावरांची कत्तल करताना आढळून आला. त्याच्या घरात एक लाख 20 हजार रुपये किमतीचे गोमांस व हत्यारे आढळून आली. यानंतर पोलिसांनी रेहान सालीम कुरेशी व जावाद सालीम कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दोघेही फरार झाले. या दोघांच्या घरातून एक लाख 60 हजार रुपये किमतीचे 800 किलो गोमांस, हत्यारे व वजनकाटा जप्त करण्यात आला. यानंतर पोलीस पथकाने शाकीर सलीम कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला असता, तो फरार झाला.त्याच्या घरातून 20 हजार रुपये किमतीचे गोमांस आणि तीन जिवंत गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. पोलिसांनी नासीर मोहम्मद कुरेशी, खालीद मोहम्मद कुरेशी, फिरोज मोहम्मद कुरेशी, रेहान सलीम कुरेशी, जावाद सलीम कुरेशी, शाकीर सलीम कुरेशी व अजमत नूरा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईवेळी गोसेवा संघाचे कार्यकर्ते चांगदेव भालसिंग, अभि वामन, गुरू पाठक, समर्थ रोडी, सोमनाथ बंग, आर्यन फलके, मनोज वाघ, संतोष पालवे, मुकुंद गर्जे, अभि इथापे, शुभम तुपे, विशाल शिंदे, आशुतोष शर्मा, विवेक मोरे, आदित्य चतुर, ओम राजगुरू यांनी मदत केली.