मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी साथीच्या आजारांचा दबा कायम आहे. यातूनच पालिका प्रशासनाने घरोघरी केलेल्या झाडाझडतीत तब्बल 14096 ठिकाणी डेंग्यू पसरावणारा एडिस डास तर 2426 ठिकाणी मलेरिया पसरवणारा अॅनोफिलीस डास आढळला आहे. शिवाय गेल्या दोन आठवडय़ांत स्वाइन फ्लूचे 119 तर लेप्टोचे 172 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी. कोणतीही लक्षणे दिसल्यास पालिका किंवा खासगी डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुंबईत घरांची झाडाझडती घेऊन डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजाराची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात येत आहेत. यामध्ये गेल्या दोन आठवडय़ांत पालिकेच्या माध्यमातून मलेरिया शोधण्यासाठी 12,072 घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2426 ठिकाणी मलेरिया उत्पत्ती करणारा अॅनोफिलीस डास आढळला, तर 632997 घरांच्या तपासणीत 14096 ठिकाणी डेंग्यू निर्माण करणारा एडिस डास आढळला. रोगांना कारणीभूत ठरणारी ही ठिकाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नष्ट करण्यात आली.
पालिकेचे तीन हजार बेड तैनात; पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका सज्ज
रुग्णांसाठी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष 500 बेडही तैनात आहेत. संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर धुम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे.
अशी घ्या काळजी
पावसाळी आजार टाळण्यासाठी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, तर स्वाइन फ्लूपासून बचावासाठी गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा. मास्क वापरावा.
ऑगस्टच्या दोन आठवडय़ांत असे आढळले रुग्ण
मलेरिया 555
डेंग्यू 562
लेप्टो 172
गॅस्ट्रो 534
कावीळ 72
स्वाइन फ्लू 119
चिकनगुनिया 84