पित्ताबरोबरच 15 गोष्टींसाठी गुणकारी आहे कोकम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकम फळाचा उपयोग पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिका नावाने ओळखले जाते. कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात.

औषधी गुणधर्म
कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.

कोकमाचा उपयोग

1) चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.

2) कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.

3) कोकममध्ये पाणी घालून त्याचा बल्क बनवावा व हा बल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.

4) कोकमचा बल्क, नारळाचे दूध, कोिथबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.

5) अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकम कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.

6)अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.

7) पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.

8) हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.

9) हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.

10) हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.

11) रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.

12) कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.

13) कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

14) १० तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.

१५) मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा बल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते

कोकमचे सेवन कसे करावे?
तुम्ही कोकमाचा रस पिऊ शकता, स्मूदीमध्ये वापरू शकता आणि फळांच्या सॅलडमध्ये घालू शकता. त्याची पिकलेली फळाची साल काढूनही खाता येते. याशिवाय त्याची चटणीही बनवली जाते. कोकमची साल वाळवली जाते . अनेक प्रकारे वापरली जाते. त्यामुळे अन्नाला आंबटपणा येतो. महाराष्ट्रीयन आणि कोकणी जेवणात चिंचेच्या जागीही याचा वापर केला जातो. कोकम सरबत आणि कोकमपासून बनवलेली सोल कढी हे सर्वात लोकप्रिय आहे. याशिवाय मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्येही कोकमची चव चांगली लागते. कोकमाचे फळ सोलून ते मिठाच्या पाण्यात बुडवून कडक उन्हात वाळवले जाते. या खारवलेल्या सालीला आमसूल असं म्हणतात. साधारणपणे उन्हाळ्यात कोकणात कोकमापासून मोठ्या प्रमाणावर आमसूल आणि आगळ तयार करण्यात येतो. कोकमाची साल मिठाच्या पाण्यात सुकवताना त्यातून तो रस निघतो तो आगळ म्हणून वापरतात. त्यामुळे बारा महिने या प्रांतात आमसूल, कोकम सरबत आणि आगळ विक्रीसाठी उपलब्ध असतात. कोकणात अनेक पदार्थांमध्ये या आमसूल मोठ्या प्रमाणावर जाते. अनेक प्रकारच्या भाजी, चटणी, सोलकढी, कोकमाचे सार,माशाचे सार, माशाचे तिखलं, कोकमाचे सरबत करण्यासाठी आमसूल वापरले जाते.

आरोग्यासाठी आमसूल खाण्याचे फायदे

रोगप्रतिकार शक्ती वाढते
कोकमामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की कोकमातील पोषक तत्त्व तुमचे आजारपणापासून संरक्षण करतात. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी कोकमाचे सार अथवा सरबत नियमित पिणे गरजेचं आहे.त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही शिवाय तुमची प्रतिकार शक्ती अधिक चांगली होईल.

वजन नियंत्रित राहते
आजकाल वाढते वजन ही अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. मात्र जर तुमच्या आहारात नियमित कोकम असेल तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. कारण कोकमाच्या फळात कोणतेही सॅच्युरेटेड फॅट्स नाहीत शिवाय त्याच्यामधील कॅलरीजचे प्रमाणही इतर फळांच्या मानाने कमी आहे. म्हणूनच कोकमाचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

ह्रदयासाठी उत्तम
कोकमाचा समावेश आहारात असेल तर तुम्हाला ह्रदयसमस्या कमी जाणवतात. कारण यामुळे तुमचे ह्रदय रोगापासून संरक्षण होते. कोकमाच्या फळात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, बी कॉप्लेक्स, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक असतात. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला या पोषक घटकांची गरज असते. सहाजिकच जेव्हा तुमच्या आहारात कोकम असतं तेव्हा तुम्हाला ह्रदयविकार अथवा स्ट्रोक येण्याचा धोका कमी असतो. ह्रदयाचे कार्य उत्तम चालण्यासाठी आहारात कोकमाचा समावेश करणं नक्कीच उत्तम ठरेल.

मधुमेह नियंत्रणात राहतो
कोकमामध्ये अॅंटिडायबेटिक गुणधर्म असतात. आमसूल चे फायदे अनेक आहेत त्यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मधुमेहींसाठी कोकम वरदान ठरू शकते. कोकमामध्ये असलेल्या अॅंटि ऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरात इन्सुलीनची निर्मिती नियंत्रणात राहते.ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि मधुमेहींच्या समस्या नियंत्रणात राहतात. त्यामुळे जर तुम्ही मधुमेही असाल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोकमाचा समावेश करा.

चिडचिड आणि नैराश्य कमी होते
आजकालची धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताणतणाव याचा नकळत परिणाम तुमच्या स्वभाव आणि आरोग्यावर होत असतो. या जीवनशैलीमुळे अनेक जण नैराश्याच्या आहारी जातात. सतत काम करताना चिडचिड होत असेल तर वेळीच योग्य ते उपचार करणं नक्कीच गरजेचं आहे. कोकमामध्ये फ्लेवॉनॉइड, अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतात. ज्यामुळे तुमच्या मेंदूला शांतता मिळते. ज्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो आणि नैराश्यामधून बाहेर पडण्यास मदत होते.

पचनशक्ती सुधारते
पोट फुगणे, गॅस होणे, उलटी, जुलाब असे त्रास अनेकांना वारंवार जाणवतात. यासाठी तुमची पचनशक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुमच्या आहारात कोकमाचा समावेश असेल तर तुमचा अपचन, मुळव्याधी, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. कारण कोकम एक पाचक फळ आहे. यासाठी दररोज आहारात सोलकढी, कोकमाचं सार यांचा समावेश जरूर करा.

मूड सुधारतो
कोकमाच्या फळाचा मानसिक स्वास्थावर चांगला परिणाम होतो. कोकमाच्या सेवनामुळे चिडचिड, ताणतणाव, नैराश्य दूर होण्यास मदत होते. कोकमाचे सरबत पिण्याने मनाला शांतता वाटते आणि मूड लगेच चांगला होतो कारण कोकमामध्ये तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स संतुलित करणारे गुणधर्म असतात. कोकमामुळे मेंदूला चालना मिळते आणि उत्साह वाढतो. मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर मूड चांगला करण्यासाठी तुम्ही कोकमाचे सरबत पिऊ शकता.

अॅंटि फंगल
कोकमातील अॅंटि फंगल आणि अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे कोणत्याही इनफेक्शनपासून तुमचे रक्षण होते. शिवाय कोकम टिकवून ठेवता येत असल्यामुळे तुम्ही वर्षाचे बारा महिने त्याचा वापर करू शकता. ज्यामुळे वर्षभर तुम्हाला आहारात कोकमाचा वापर करता येतो. कोकमाचा वापर करून तुम्ही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकता. जर तुम्हाला सतत फंगल इनफेक्शनचा त्रास होत असेल तर आहारात कोकमाचा वापर करणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

सौंदर्यासाठी आमसूलचे फायदे
कोकमाचा फायदा आरोग्यावर जितका होतो तितकाच तुमच्या केस आणि त्वचेवरही होतो. कोकम तेल अथवा क्रीमचा वापर तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील करू शकता.

पायांच्या भेगा दूर होतात
हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडण्याचा त्रास अनेकांना जाणवतो. कोरडे हवामान आणि त्यामुळे होणारी कोरडी त्वचा याचा परिणाम पायाच्या टाचांवर होतो. पायाच्या टांचाना भेगा पडल्या की त्यातून रक्त येते आणि साधे चालणेदेखील कठीण होते. यासाठीच वेळीच पायाच्या भेगांवर उपचार करायला हवेत. कोकम तेल पायाला लावण्यामुळे पायाच्या भेगा कमी होतात आणि पाय मुलायम दिसू लागतात.

त्वचेची काळजी
कोकमातील अॅंटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुम्ही याचा वापर केस आणि त्वचेसाठी नक्कीच वापरू शकता. कोकमाच्या तेलामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. कोकम तेलाला काही लोक मुठीया असंही म्हणतात. ते वितळवून ते त्वचेवर लावलं जातं. ज्यामुळे त्वचेचं पोषण होतं आणि त्वचा कोरडी पडत नाही.

भाजलेली जखम लवकर बरी होते
कोकमाचे तेल अथवा मुठिया या एखाद्या मलमाप्रमाणे कार्य करतात. भाजण्यामुळे झालेली एखादी जुनाट अथवा मोठी जखम लगेच भरून निघते. पूर्वी जखमा बऱ्या करण्यासाठी कोकम तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. कोकमातील अॅंटि बॅक्टेरिअल घटक जखमांना चिघळू देत नाहीत आणि नवीन त्वचेचा थर लवकर निर्माण करण्यास मदत करतात. म्हणूनच घरात स्वयंपाक करताना भाजल्यास एखादी छोटी जखम बरी करण्यासाठी कोकमाचे तेल प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.

शरीराला नैसर्गिक थंडावा देते
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास जाणवतो. मात्र जर तुमच्या अंगावर पित्ताचे चट्टे, पुरळ उठत असेल आणि त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर कोकम तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. कोकमाचं सरबत पिण्यामुळे तुमची पित्ताची समस्या कमी होऊ शकते. कारण कोकमाचे फळ हे शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे आहे. यासाठीच उन्हाळ्यात कोकमाचे सरबत अथवा सोलकढी पिण्यास चांगला फायदा होतो.

केसांसाठी उत्तम
कोकम त्वचेप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते. कारण कोकमाचे तेल अथवा कोकम बटर वापरल्यामुळे केसांना व्हिटॅमिन ईचा पूरवठा होतो. ज्यामुळे केसांच्या वाढीसाठी चालना मिळते. केसांच्या मुळांना नारळाच्या तेल आणि कोकमाचे तेल लावण्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या दूर होते. स्काल्पचे योग्य पोषण झाल्यामुळे केसांच्या अनेक समस्या कोकम तेलामुळे कमी होतात. यासाठी अनेक हेअर प्रॉडक्टमध्ये कोकम तेलाचा वापर केला जातो.