
पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोसणारा देश असून हिंदुस्थानात दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे हिंदुस्थानने अनेकदान दिले आहेत. आता अमेरिकेच्याच एका अहवालाने पाकिस्तानचा हा चेहरा उघड केला आहे. पाकिस्तानमध्ये किमान 15 दहशतवादी संघटना सक्रिय असून अनेक संघटना भारताला लक्ष्य करण्यासाठी काम करत आहेत. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांचा त्यात समावेश आहे.
अमेरिकन ‘काँग्रेसच्या रिसर्च सर्व्हिस’ने (सीआरएस) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या 2014 च्या नॅशनल अॅक्शन प्लॅनसारख्या उपायांनंतरही तेथे दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. यापैकी 12 संघटनांना अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. या संघटना समूळ नष्ट करण्यात अपयश आले असून पाकिस्तानच्या भूमितूनच त्यांचा कारभार सुरू आहे.
पाकिस्तानचा कांगावा उघड
बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा भागात हिंदुस्थानने दहशतवादी संघटनांना बळ दिल्याचा कांगावा पाकिस्तानकडून नेहमी केला आहे. मात्र, याबाबत पाकिस्तानच तोंडघशी पडला आहे. या भागातील दहशतवादी हल्ल्यांमागे हक्कानी नेटवर्कचा हात असून त्यास पाकिस्तानच्याच गुप्तचर सस्थेचे पाठबळ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


























































