
मुंबईचा महापौर मराठीच होणार असे सांगण्यापासून पळ काढणाऱया मुंबई भाजपचा खरा चेहरा उमेदवार यादीवरून आज समोर आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने 66 जणांची पहिली यादी आज जाहीर केली. यामध्ये पटेल, त्रिवेदी, गाला, शर्मा, कनोजिया, पुरोहित अशा आडनावाच्या दीड डझन अमराठी उमेदवारांचा भरणा असल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना महायुतीची घोषणा न करताच मुंबई भाजपने आज 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बंडखोरीच्या भीतीने काही मतदारसंघातील उमेदवारांकडे रातोरात पक्षाचा एबी फॉर्म पोहचवून सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मुंबई भाजपच्या यादीवर नजर टाकल्यास पहिला यादीत जवळपास 20 अमराठी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
या अमराठींचा यादीत भरणा
जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जैस्वाल, मनीषा यादव, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदरसिंह तिवान, संदीप पटेल, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश मकवाना, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा, आकाश पुरोहित या अमराठी उमेदवारांचा यादीत समावेश आहे.
सोशल मीडियात भाजपवर संताप
भाजपकडे त्यांचे स्वतःचे उमेदवार नाहीत त्यामुळे त्यांना अमराठी उमेदवार उभे करावे लागतात. हे आहे भाजपचे मराठी प्रेम. भाजपचा डाव ओळखून आता तरी मुंबईकरांनो सावध व्हा, असा संताप अनेक मराठी जनांकडून सोशल मीडियात पोस्ट करत व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीच्या राखी जाधव भाजपवासी
मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे फारसे अस्तित्व नसतानाही गेली अनेक वर्षे पक्षाची कमान एकहाती सांभाळणाऱया माजी नगरसेविका राखी जाधव अखेर भाजपवासी झाल्या. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजप आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीत तुतारीची साथ सोडून कमळ हाती घेतले.






























































