गुजरातला जाणाऱ्या हायड्रोजन गॅस सिलिंडरच्या ट्रकने शनिवारी मुंबईच्या वेशीवर ट्रफिकचा प्रचंड जांगडगुत्ता केला. हा भरधाव ट्रक वसई फाटय़ाजवळ पहाटे तीनच्या सुमारास आडवा झाला. त्यामधून वेगाने आदळलेल्या हायड्रोजन गॅसच्या सिलिंडरनी एकामागोमाग एक पेट घेतले. भयंकर दुर्घटनेमुळे पाहून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक काही क्षणात ठप्प झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यामुळे गुजरात लेनवर तब्बल 30 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. ही रांग चक्क बोरिवलीपर्यंत गेल्याने सोळा तासाहून अधिक काळ वाहतूककोंडी झाली. यामुळे विकेण्डच्या मुहूर्तावर गटारी साजरी करण्यासाठी निघालेल्या हौशे नवशे गवशांसह हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.