राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपला दे धक्का, काय घडणार याची पुसटशी कल्पना नव्हती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सोबत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र आपल्याला काहीही न सांगता राजभवन येथे नेण्यात आले. मात्र पुढे काय घडणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. जे काही घडले ते गैरसमजुतीने केले असून आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणि भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत परतलेल्या आमदारांनी दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले धनंजय मुंडे यांच्यासह 16 पैकी नऊ आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत.

शिवसेना तसेच राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. यावेळी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी रात्रीपासून पहाटेपर्यंत काय घडले याची हकीकतच पत्रकार परिषदेत सांगितली. ते म्हणाले, रात्री 12 वाजता फोन आला. या फोनवरून सकाळी 7 वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आले, माझ्या आधी 8-10 आमदार तिथे उपस्थित होते. चर्चेसाठी जायचं आहे सांगण्यात आलं. एका गाडीतून थेट राजभवनातील हॉलमध्ये बसविण्यात आलं. इथे काय घडतंय याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. तेवढय़ात देवेंद्र फडणवीस तिथे आले. काही कळायच्या आतच अर्ध्या मिनिटातच फडणवीस यांचा शपथविधी झाला. राजभवनातून बाहेर पडल्यानंतर आम्ही पवारसाहेबांकडे परतलो. बीडचे संदीप क्षीरसागर यांनी आपल्याबाबतही हेच घडल्याची प्रतिक्रिया दिली, तर सुनील भुसारा यांनी असं काही घडतंय हे पाहिल्यानंतर रक्तदाबच वाढला होता, असे सांगितले.

मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही – कोकाटे

अजित पवार यांच्यासोबत राजभवनवर गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी ‘मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही. अजित पवार यांच्या सांगण्याकरून मी राजभवनावर गेलो होतो. गटनेते असल्याने त्यांचा आदेश पाळला. तिथं काय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते. पण मी पक्षासोबत आहे. एकदा घेतलेला निर्णय आपण कदापि बदलणार नाही,’ असं कोकाटे यांनी सांगितले.