निवडणूक सुरू असताना मतदारांवर प्रभाव पडेल असे कृत्य करता येत नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी देशात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकी दरम्यान अनेकदा आचारसंहितेचे उल्लंघन केले. या विरोधात शिवसेना आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आलेल्या तक्रारींना निवडणूक आयोगाकडून केराची टोपली दाखविण्यात आली. मात्र महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात संथ गतीने मतदान झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला? या कारणास्तव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांवर मतदान पार पडले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तर काही ठिकाणी संथगतीने मतदान सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले होते. ज्या ठिकाणी शिवसेनेचे मतदान आहे तेथे संथ गतीने मतदान होण्याचे प्रकार घडत असल्याकडे लक्ष वेधले होते. यावर आक्षेप घेऊन भाजप नेते आशीष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती. त्याची आयोगाने तत्परतेने दखल घेतली.
मोदींची ध्यानधारणा मूक प्रचार नव्हता काय?
निवडणूक सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 कॅमेरे लावून ध्यानधारणेला बसले होते आणि सगळे चॅनेल त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करत होते, तो मूकप्रचार नव्हता काय? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. भाजपला मतदान करा, रामललाचे फुकट दर्शन करायला मिळेल, असे वक्तव्य करून केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मतदारांना प्रलोभन दाखवले होते. याबद्दलचे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले होते. पण त्याची साधी पोचदेखील आम्हाला मिळाली नाही. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा गैरवापर कसा सुरू आहे याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला एकूण 17 पत्रे पाठवली होती. निवडणुकीत पैशांचं वाटप सुरू असल्याची त्यातील काही पत्रे होती. त्यावर आयोगाने काय कारवाई केली याची माहिती आयोगाने द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.