नेवासा- घोडेश्वरी देवीच्या मंदिरातील 17 किलो चांदी, हिऱ्यांची चोरी,सोनई पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेवासा तालुक्यातील घोडेगावचे ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरटय़ांनी गाभाऱ्यातील 17 किलो चांदी व हिरे असा 10 लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी भाविक व पुजारी मंदिरात गेले असता चोरीची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय थोरात यांनी भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तातडीने ठसे तज्ञांना व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

सोनई व घोडेगाव परिसरात प्रसिद्ध असणाऱ्या श्री घोडेश्वरी माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिराचे भव्य बांधकाम देवगडचे मठाधिपती भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाले. गुरुवारी मध्यरात्री मंदिराचा दरवाजा तोडून गाभाऱ्यातील चांदी व हिरे असा 10 लाखांचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संभाजी करपे तपास करीत आहेत.

श्री घोडेश्वरी माता मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे उघड झाले आहे. यामुळे लाखो रुपयांच्या चोरीचा सुगावा लागणे अवघड झाले आहे.