रायगडात ‘ह्याला मार त्याला मार’, 30 सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले 17 पोलिसांना मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्हयात गेल्या 11 वर्षांत तब्बल 47 शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये 17 पोलिसांचा समावेश आहे. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची सुरक्षाच हल्लेखोरांमुळे धोक्यात आली आहे.

श्रीवर्धन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर यांना गेल्या आठवडय़ात पर्यटकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. समुद्रकिनाऱ्य़ावर ड्रोन कॅमेऱ्य़ाने प्री-वेडिंग शूट करणाऱ्य़ा या पर्यटकांना पोलीस निरीक्षकांनी रोखले. यामुळे संतप्त झालेल्या 11 पर्यटकांनी खेडेकर यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीररीत्या जखमी झाले. या मारहाणीमुळे सरकारी कर्मचाऱ्य़ांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

जिह्यात शासकीय कर्मचाऱ्य़ांना मारहाण होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या 11 महिन्यांत 47 शासकीय कर्मचाऱ्य़ांना मारहाण करण्यात आली. यात 17 पोलीस, 13 एसटी चालक वाहक, 5 वीज वितरण विभागाचे कर्मचारी, महसूल विभागातील 4, वैद्यकीय अधिकारी 4, मुख्याधिकारी 1, बँक, पाणीपुरवठा विभाग आणि इतर विभागातील प्रत्येकी 1 अशा सरकारी कर्मचाऱ्य़ांचा समावेश आहे. म्हणजेच मारहाण होणाऱ्य़ांमध्ये सरकारी कर्मचाऱ्य़ामध्ये पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे.
शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी कायद्याने त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. यासाठी दोन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो, पण तरीही हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे.
बरेचदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्य़ांना होणाऱ्य़ा मारहाणीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या पुढाऱ्य़ांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असतो. या कारणामुळे अलीकडच्या काळात शासकीय कर्मचाऱ्य़ांना मारहाणीचे प्रमाण वाढले असल्याचे सध्या दिसून येत आहे.