दिव्यात 17 हजार दुबार मतदार; सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असतानाच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहरामध्ये १७ हजार २५८ दुबार मतदार आढळून आले आहेत. त्याची सखोल चौकशी करून ती नावे ताबडतोब वगळावीत अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व भाजपने केली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली. तसेच सुधारित याद्या जाहीर कराव्यात असादेखील आग्रह धरला आहे.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये दुबार मतदार दिसून येत असून झपाट्याने विकसित होत असलेल्या दिवा गावातही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची विविध राजकीय पक्ष जय्यत तयारी करीत असून जोरबैठकाही सुरू झाल्या आहेत. दिवा शहर व परिसरातदेखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे. वॉर्ड क्रमांक २७ व २८ मध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये १७ हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

आज शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दुबार मतदार याद्यांचे पुरावेच सादर केले. तसेच निवेदनदेखील दिले असून दुबार मतदार शोधून दोषमुक्त यादी तयार करावी अशी मागणी केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, विधानसभा संघटक योगिता नाईक, मनसेचे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, भाजपचे शहराध्यक्ष सचिन भोईर, रोशन भगत, राष्ट्रवादीचे राजेश साटम, मकसुद खान, जगत सिंग, प्रवीण सिंह, हिरामण गंगावसे आदी उपस्थित होते.

भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये पुन्हा दुबार मतदारांच्या नोंदी होऊ नयेत याची काळजी घ्यावी तसेच निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात अशी मागणीही केली असल्याची माहिती तात्या माने व रोहिदास मुंडे यांनी केली. निवडणुका निष्पक्षपाती होण्यासाठी निर्दोष मतदार याद्या तयार करणे गरजेचे असून पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य मतदारांमध्येदेखील कोणतीही शंका राहता कामा नये असे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना सांगितले.