अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यानाही; रायगड जिल्ह्यातील 1748 रस्ते गेले वाहून

253

रायगड जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीने रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेले ग्रामीण व इतर रस्ते वाहून जाऊन, भेगा पडून, दरड कोसळून रस्त्याचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील 1748 रस्ते हे पूर्णतः वाहतूक विरहित झाल्याने याचा फटका जवळच्या हजारो गावातील नागरिकांना बसला आहे. या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला असल्याने रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी तातडीची 70 कोटीच्या निधीची पूर्तता करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.

रायगड जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीने थैमान घातले होते. अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात दरडी कोसळल्या. या अतिवृष्टीचा फटका जिल्हा परिषदेच्या रस्त्यानाही बसला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले अनेक ठिकाणचे रस्तेच वाहून गेले, रस्त्यांना भेगा पडल्या. मोऱ्या, पूल, साकव, संरक्षक भिंती यांनाही अतिवृष्टीचा तडका बसला आहे. रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे जवळच्या गावाचा संपर्क तुटला आहे. तर या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू करून रस्ते वाहतुकीसाठी तयार केलेले आहेत.

जिल्ह्यात अलिबाग 112, मुरुड 45, रोहा 130, पेण 132, सुधागड 87, कर्जत 152, खालापूर 109, उरण 31, पनवेल 151, महाड 257, पोलादपूर 112, माणगाव 148, तळा 85, म्हसळा 102, श्रीवर्धन 95 असे एकूण 1748 ग्रामीण रस्त्याचे नुकसान होऊन अक्षरश धूळधाण झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी अंदाजित 107 कोटींची गरज आहे. तातडीच्या दुरुस्तीसाठी 70 कोटी निधीची आवश्यकता असून तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून शासनाकडे पाठविला आहे.

पंधरा दिवसावर गणपती सण येऊन ठेपला असून चाकरमानी गावी येण्यास सुरुवात होईल. मात्र जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या रस्त्याची वाताहत झाली असल्याने व काही रस्ते वाहतुकीस बंद असल्याने गणेशभक्तांना गावी येताना पर्यायी रस्त्याने गावात यावे लागणार आहे. त्यामुळे नुकसान झालेले रस्ते तात्पुरते तरी वाहतुकीस तयार करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शासनाकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीच्या 70 कोटी निधीची मागणी केली आहे. मात्र निधी मिळण्याआधी महाड, पोलादपूर, कर्जत, अलिबाग येथील रस्त्याची कामे सुरू केली आहेत. ज्या गावांचा संपर्क रस्त्यामुळे तुटला आहे. त्या गावांना पर्यायी रस्ता तयार केला आहे. तर उर्वरित रस्त्याची दुरुस्तीची कामेही लवकरात लवकर केली जाणार आहेत. – अॅड. आस्वाद पाटील, सभापती, बांधकाम समिती, राजीप

आपली प्रतिक्रिया द्या