अंधेरी-दहिसर-डी. एन. नगर मेट्रो स्थानकांवर 187 सरकते जिने

479

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-7 आणि दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी 187 सरकते जिने लावण्यात येणार आहेत. बाणडोंगरी स्थानकावर त्यातील पहिला सरकता जिना उभारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामासाठी 101 कोटी रुपये खर्च येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने हे काम करण्यात येत आहे. साडेसोळा किलोमीटर लांबीच्या मेट्रो-7 मार्गावर 13 स्थानके असून त्यावर 82 सरकते जिने उभारण्यात येणार आहेत. अंधेरी पूर्व, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद, आरे, पठाणवाडी, बाणडोंगरी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मागाठणे, देवीपाडा, नॅशनल पार्क आणि ओव्हरी पाडा या स्थानकांवर प्रत्येकी सहा जिने उभारले जाणार असून शंकरवाडी आणि पुष्पा पार्क या स्थानकांवर प्रत्येकी 8 सरकते जिने उभारले जाणार आहेत.

दहिसर ते डी. एन. नगर या मेट्रो-2 मार्गावरील स्थानकांमध्ये 105 सरकते जिने उभारण्यात येणार आहेत. त्यातील प्रत्येकी सहा सरकते जिने दहिसर, आनंद नगर, ऋषि संकुल, आयसी कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड, कस्तूर पार्क, बांगुर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर आणि शास्त्राr नगर या स्थानकांवर बसविण्यात येणार आहेत. एकट्या डी. एन. नगर स्थानकावर 9 सरकते जिने उभारले जाणार आहेत.

तासाला 7300, वर्षाला 437 कोटी प्रवासी वाहून नेणार

हे सरकते जिने तासाला 7300 प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेचे आणि जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा असलेले आहेत. वर आणि खाली जाऊ शकणारे हे जिने वर्षाला सुमारे 437 कोटी प्रवासी वाहून नेऊ शकतात, अशी माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या