कोल्हापूरात 19 तपासणी नाक्यांवर वाहनांची काटेकोर तपासणी – पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

432

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 19 तपासणी नाक्यांवर सुमारे 8 हजार वाहने दररोज येत आहेत. या सर्वांची नोंद ठेवण्यात येत आहे. तसेच माल वाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक होऊ नये, याची दक्षता पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यातून मंगळवारी एका दिवसात दोन हजार वाहनांचा प्रवेश झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी बुधवारी अंकली-उदगाव तपासणी नाक्याला भेट देत पाहणी केली. याठिकाणी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून काटेकोरपणे तपासणी सुरु होती. कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या 61 रस्त्यांपैकी 19 मार्गावर तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी वैद्यकीय पथकेही ठेवण्यात आली आहेत. दररोज पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करण्यात येते. विशेषत: मालवाहतूक वाहनातून प्रवासी वाहतूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. मंगळवारी एका दिवसात जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून सुमारे दोन वाहनांचा प्रवेश झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 19 तपासणी नाक्यांमधून सुमारे 8 हजार वाहने दररोज येत आहेत. यासर्वांची नोंद ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.

परवाना घेवून येणाऱ्या व्यक्तींसाठी तीन प्रती स्टिकर बनविण्यात आले आहे. एक प्रत तपासणी पथकाकडे दुसरी संबंधिताकडे तर तिसरी प्रत रुग्णालयातील पोलीस अधिकाऱ्याकडे दिली जाते. संबंधित व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेला का याबाबत क्रॉस चेकिंग केले जाते. त्याचबरोबर संबंधिताला फोनवरुनही नियंत्रण कक्षामधून विचारणा करण्यात येते. प्रवाशांनीही अत्यावश्यक कामासाठी परवाना घेवूनच प्रवास करावा. आपली कोणतीही माहिती लपवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अभिनव देशमुख यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या