चर्चा तर होणार ना भाऊ! 1832 मध्ये जन्म, वय 190 वर्ष; जाणून घ्या कोण आहे ‘जोनाथन?’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वात वयोवृद्ध माणून म्हणून इंडोनेशियाच्या 145 वर्षीय सोदीमेजो ऊर्फ महब गोथो यांची नोंद आहे. 31 डिसेंबर 1870 अशी त्यांची जन्मतारीख कागदोपत्री नोंद आहे. पण आज आपण माणसाबाबत नाही तर एका प्राण्याबाबत जाणून घेणार आहोत. या प्राण्याचा जन्म सोदीमेजो यांच्याही आधी झाला होता. आजही हा प्राणी जिवंत असून पृथ्वीतलावर वावरत आहे. आपण जोनाथन नावाच्या एका कासवाबाबत वाचत आहात.

जोनाथन याने नुकताच आपला 190 वा वाढदिवस साजरा केला. जगातील सर्वात वयस्कर कासव म्हणून जोनाथनची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. तुई मलिला नावाच्या एका कासवाचा विक्रम जोनाथन याने मोडला आहे. तुई मलिला नावाचे कासव 188 वर्षे जगले होते.

एका रिपोर्टनुसार, जोनाथन याचा जन्म 1832 मध्ये झाला होता. 1882 मध्ये त्याला सेशेल्मधून साऊथ अटलांटिक आयलँड सेंट हेलेनामध्ये आणण्यात आले. त्याच्यासोबत अन्य तीन कासवही येथे आणण्यात आले होते. त्यावेळीच जोनाथनचे वय 50 हून अधिक होते. 1930 मध्ये सेंट हेलेनाचे गव्हर्नर स्पेन्सर डेव्हीस यांनी या कासवाचे नाव जोनाथन असे ठेवले. आपले बहुतांश आयुष्य त्याने गव्हर्नरच्या घरातच व्यतित केले आहे.

जोनाथन याला माणसाचा चांगलाच लळा लागलेला आहे. त्याला माणसांसोबत वेळ घालवायला आवडते. तसेच उन्हामध्ये बसण्यासही त्याला आवडते. तसेच कोबी, काकडी, गाजर, सफरचंद, केळी आणि मोसमी फळं त्याचा आहार आहे. वय वाढल्यामुळे सध्या त्याला दिसायला कमी झाले असून गंधही लवकर कळत नाही. मात्र त्याची श्रवणशक्ती अद्यापही चांगली कार्यरत आहे.