
आसामच्या जोरहाट येथून झेपावलेले हिंदुस्थानी हवाई दलाचे ‘सुखोई-30 एमकेआय’ हे लढाऊ विमान कोसल्याचे निष्पन्न झाले आहे. विमानातील दोन्ही वैमानिक स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाईट लेफ्ट. पूर्वेश दुरुगकर हे शहीद झाले. पूर्वेश नागपूरचे रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक लढवय्या पुत्र गमावला आहे.
जोरहाट येथून नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी झेपावलेले सुखोई विमान गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कार्बी आंगलोंग जिह्यातील दुर्गम डोंगररांगांच्या भागात विमान रडारवरून गायब झाले. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात येत होता. अखेर हवाई दलाने आज मध्यरात्री 1.09 वाजता विमान कोसळल्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही वैमानिक शहीद झाल्याचे आज सकाळी 9.14 वाजता स्पष्ट करण्यात आले. विमान कोसळले ते ठिकाण जोरहाट येथून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. याचा हवाई दलाकडून तपास करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. अपघातात शहीद झालेल्या दोन्ही वीरपुत्रांना हवाई दलाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हिंदुस्थानी हवाई दलाची ताकद आहे सुखोई
सुखोई एसयू-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलातील अत्याधुनिक आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हवाई संरक्षण, लांब पल्ल्याचे हल्ले तसेच देखरेख अशा अनेक कामांसाठी हे विमान सक्षम मानले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये दोन सुखोई विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. 4 जून 2024 रोजी नाशिकजवळ प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने एक विमान शेतात कोसळले होते, मात्र त्या वेळी दोन्ही वैमानिकांनी वेळेत बाहेर पडून आपले प्राण वाचवले होते. 28 जानेवारी 2023 रोजी मध्य प्रदेशमध्ये प्रशिक्षण मोहिमेदरम्यान एक सुखोई आणि मिराज-2000 ही दोन लढाऊ विमाने हवेतच धडकली होती. या घटनेत सुखोईचे वैमानिक बचावले, पण मिराज-2000 चा वैमानिक मृत्युमुखी पडला.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पूर्वेश होते सहभागी
फ्लाईट लेफ्ट. पूर्वेश दुरुगकर हे ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झाले होते. पूर्वेश यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण आहे. पूर्वेश यांनी ‘आयआयटी’मधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भंडारा जिह्यातील शाहपूर येथील डीएसए अकादमीमधून त्यांनी लष्कराचे पूर्व शिक्षण पूर्ण केले होते. पूर्वेश हे दहा दिवसांपूर्वीच नागपुरात एका काwटुंबिक सोहळय़ासाठी आले होते. त्यांचे वडील रवींद्र दुरुगकर हे रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून वीरपुत्र गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या 4 वर्षांपूर्वीच पूर्वेश हे प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून सेवेत दाखल झाले होते. तरुण वयात मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब होती. पूर्वेश यांना देशाचे लढाऊ विमान उडवत असल्याचा अभिमान होता, असे वडील रवींद्र यांनी भावुक होत सांगितले.




























































