नववीतील 2 लाख विद्यार्थी हरवले; दहावीचा परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थी संख्येवरून स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील विविध शाळांमध्ये हजेरीपटावर असलेले सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी हरवल्याची शक्यता आहे. पहिली ते आठवी पास करण्याच्या धोरणामुळे हे विद्यार्थी नववीत दाखल झाले. नववीची परीक्षा पास होऊनही या विद्यार्थ्यांनी दहावीचा परीक्षा अर्ज भरला नसल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.

गेल्या वर्षी 19 लाख 34 हजार 94 विद्यार्थ्यांनी नववीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यातील 18 लाख 31 हजार 344 विद्यार्थी नववीची परीक्षा पास झाले. नववी पास, नापास सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणे अपेक्षित होते. मात्र यावर्षी दहावीला परीक्षेसाठी आलेले अर्ज 16 लाख 57 हजार आहेत. त्यातील साधारण 56 हजार पुनर्परीक्षार्थी आहेत. म्हणजे साधारण 16 लाख नियमित विद्यार्थी आहेत. म्हणजेच सुमारे दोन ते तीन लाख विद्यार्थी नियमित प्रवाहातून बाहेर पडले आहेत. त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे.

चौकशीअंती शाळा सोडल्याची अनेक कारणे सापडतील

नववीतून गायब झालेल्या मुलांचा शिक्षण विभागाने शाळांमार्फत शोध घेतल्यास शाळा सोडल्याची अनेक कारणे उपलब्ध होतील, असे सिस्कॉम संस्थेने स्पष्ट केले. यातील किती विद्यार्थ्यांचे बालविवाह झाले, कितीजण बालमजुरी करतात, आर्थिक चणचण, पालकांचे स्थलांतर यामुळे किती विद्यार्थ्यांची शाळा सुटली याचा तपास लावता येणे शक्य असल्याचे सिस्कॉमने म्हटले आहे.

सर्व काही पटसंख्या राखण्यासाठी

हे दोन लाख विद्यार्थी पहिली ते आठवीत असतानाच गळती झालेले असावेत, असा आरोप पुणे येथील सिस्काँम संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करता येत नाही, त्याचा फायदा घेत शाळांनी विद्यार्थी उपस्थित नसतानादेखील त्याचे नाव कमी न करता पुढील वर्गात गेल्याचे दाखवून मान्यतेसाठी पट कायम ठेवला आहे. पुढे कागदोपत्री विद्यार्थी नववीत गेल्यावर गैरहजर असल्याचे दाखविले जाते, असेही बाफना यांनी सांगितले.

  •  नववी दाखल 19, 34, 094.
  • नववी पास 18, 31, 344.
  • नववी नापास 1, 02, 750 (17 नंबरचा अर्ज भरणे अपेक्षित).
  • दहावीचा परीक्षा अर्ज भरलेले सुमारे 16 लाख 57 हजार.
  • नववी पास पण दहावीच्या परीक्षेला बसले नाही 1, 74, 344.