
सामना ऑनलाईन | प्रतिनिधी
बुलढाण्यातील भीषण अपघातात 13 ठार
भरधाव ट्रकचे टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर जाऊन आदळला. ही धडक एवढी जोरदार होती की जीपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. मलकापूरजवळ दुपारी 2.30 वाजता झालेल्या या भीषण अपघातात 13 जण ठार तर तीन जखमी झाले.
मलकापूर येथून प्रवासी वाहतूक करणाऱ्या महिंद्रा मॅक्झिमो गाडीने 15 प्रवासी अनुराबाद-झोडगाकडे निघाले होते. रसोया कंपनीजवळ मुक्ताईनगरकडून अकोल्याकडे जाणाऱ्या ट्रकचे टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. हा भरधाव ट्रक जीपवर आदळला. जबरदस्त धडक बसल्याने जीपचा चुराडा झाला आणि 13 प्रवासी जागेवरच ठार झाले तर तिघेजण ट्रकखाली दबले. या तिघांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
या अपघातात अनिल मुकुंद ढगे (40, रा.अनुराबाद), किसन सुकदेक बोराडे (42, रा. अनुराबाद), नथ्थू कामन चौधरी (40, रा. अनुराबाद), छाया गजानन खडसे (40, रा. अनुराबाद), प्रकाश किसन भारंबे (40, रा जामनेर रोड, भुसाकळ), मेघा प्रकाश भारंबे (35, रा.जामनेर रोड, भुसाकळ), सोमीबाई छगन शिकडतकर (26, रा. नागझिरी जि. बऱहाणपूर (मध्य प्रदेश) ह.मु. अनुराबाद), सतीश छगन शिकडतकर (3, रा.नागझिरी), कीरेन गोकुळ भिलकतकर (07 रा. नागझिरी (मध्य प्रदेश), मीनाबाई बिलोरकर, आरती, रेखा हे ठार झाले.
देवरुख येथील सप्तलिंगी डोहात नवी मुंबईतील तिघे बुडाले
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजता नजीकच्या आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण बालंबाल बचावला आहे. ही घटना घडताना संबंधितांचे कुटुंबच तिथे उपस्थित होते.
जनार्दन संभाजी पांचाळ (44), रोशन जनार्दन पांचाळ (14), ओंकार अनिल पांचाळ (16) अशी मयतांची नावे आहेत तर प्रसाद पांचाळ (20) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.
जनार्दन हे नवी मुंबईत वास्तव्याला होते. ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करत होते. त्यांचे मूळ घर आंबवली सुतारवाडीत आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात काही दिवस ते या घरात सुट्टीनिमित्त येतात. 15 दिवसांपूर्वीच हे कुटुंब आंबवलीत वास्तव्याला आले होते. आज सकाळी 8 वाजता जनार्दन हे त्यांची पत्नी, मुलगा आणि दोन पुतण्यांसह चंद्रेश्वर येथे गेले होते. सप्तलिंगी नदीत आंघोळ करून मग देवदर्शन करून घरी परतायाचा असा त्यांचा बेत होता. सुमारे अर्धा तास नदीत डुबक्या मारल्यावर या ठिकाणी असलेल्या खोल डोहाचा त्यांना अंदाज आला नाही. यातच जनार्दन, रोशन, ओंकार आणि प्रसाद पाण्यात ओढले गेले.
सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू; सात जखमी
वणी-दिंडोरी रस्त्यावर कृष्णगावजवळ रविवारी मध्यरात्री सप्तशृंग गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या नादुरुस्त आयशर ट्रकवर दुसरा ट्रक आदळून भीषण अपघात झाला. यात चारजणांचा जागीच मृत्यू झाला, तर सातजण जखमी आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील आशीष माणिकसिंग ठाकूर (30), पेठरोड येथील सागर अशोक ठाकूर (23), कुणाल कैलास ठाकूर (25) व गणेश भगवतीप्रसाद ठाकूर (30) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पेठरोड येथील अनिल रमेश ठाकूर (35), ललिता अशोक ठाकूर (40), त्र्यंबकेश्वर येथील माणिकसिंग चंदुलाल ठाकूर (59), अकोला जिह्यातील पल्लवी योगेश ठाकूर (35), पंचवटीतील महालक्ष्मी टॉकीजजवळील धूव विश्वस्थ ठाकूर (40), देवासिंग अशोक ठाकूर (40), रंजिता ध्रूव ठाकूर (32) हे जखमी आहेत.





























































