2011च्या विश्वचषक विजयाचा ‘हा’ क्षण ठरला सर्वोत्कृष्ट!

603

तमाम हिंदुस्थानी विसरू शकणार नाहीत असा क्षण कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असेल 2011चा विश्वचषक विजयाचा क्षण. तारीख- 2 एप्रिल 2011, स्थळ- मुंबईतलं वानखेडे स्टेडिअम. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना गोलंदाज कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार लगावला आणि हिंदुस्थान पुन्हा एकदा क्रिकेटचा जगज्जेता ठरला. हा क्षण कुठलाही हिंदुस्थानी कधीच विसरू शकणार नाही. आता हा क्षण इतिहासातही सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे.

2011मध्ये हिंदुस्थानला पुन्हा एकदा जगज्जेतेपद मिळवून देण्याच्या स्वप्नात मोलाचा वाटा होता तो मास्टरब्लास्टर ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकरचा. या दिवशी त्याचं इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं होतं. 2 एप्रिल 2011 रोजी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली होती. यादरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला 2000-2020 या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळख असलेल्या लॉरियस स्पोर्टस अॅवॉर्ड्स या पुरस्काराने सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं. 2000-2020 या 20 वर्षांमधला क्रीडा विश्वातला हा सर्वात भावपूर्ण आणि तितकाच प्रेरणादायी क्षण होता. सचिन तेंडुलकरने स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. महत्वाचे म्हणजे या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील 20 दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान मिळवला आहे. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकर यांनी सचिनला हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

आपली प्रतिक्रिया द्या