माजलगाव आगाराचे २१ कर्मचारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

एसटी बस संपाच्या पार्श्वभूमीवर येथील कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून माजलगाव आगारातील २१ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

गुरुवारी मध्यरात्री पासून एसटी चे कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. कोणतीही सूचना न देता संप पुकारल्याने ग्रामीण व शहरी भागात लोकांना मोठया अडचणीना सामोरे जावे लागत आहे. टमटम, ऑटो रिक्षा, खाजगी जीप व इतर वाढीव दराने वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, असे असताना या आगारातील ३५० पैकी ३२५ कर्मचाऱ्यांनी काम करण्यास इन्कार केल्याने दोन कॅशियर, दिलीप घरत, महादेव कोल्हे, दोन लिपिक वैजनाथ शेजुळ, बाबुराव पांढरे यांच्यासह वाहक, चालक, यांत्रिक असे २१ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. दरम्यान या संपामुळे या आगारातील दररोज होणाऱ्या लांब पल्ल्याच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे, सोलापूर, पंढरपूर यासह १०६ फेऱ्या बंद झाल्याने आगाराचे दररोज साडेसहा लाख रुपये नुकसान होत आहे.