बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडय़ा मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या दिवशी आघाडीतील सर्व पक्षांच्या वतीने राज्यातील निष्क्रिय मिंधे सरकारचा राज्यव्यापी तीव्र निषेध केला जाणार आहे.
महाविकास आघाडी प्रमुख घटक पक्षांची बैठक आज मुंबई येथे पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत आम्ही चर्चा केली नाही. कारण बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. त्या घटनेवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्या घटनेच्या निषेधार्थ आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडीने येत्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र बंदमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. शाळा-कॉलेज, विद्यार्थांचे पालक, डॉक्टर्स, दुकानदार आदींनीही या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात वाढलेल्या महिला आणि बाल अत्याचाराच्या घटनांवर बोट ठेवले.
प्रकरण दाबण्यासाठीच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
बदलापूरप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याच्या सरकारच्या निर्णयावर यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. ती शाळा भाजपशी संबंधित असून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या उज्ज्वल निकम यांच्याकडे ते प्रकरण दिल्यास ते दाबले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले.