तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

43
farmer-suicide-01

सामना प्रतिनिधी । जिंतूर (परभणी)

सावळी येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली आहे. विठ्ठल सुधाकर घुगे (२४) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान विठ्ठलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सततच्या नापिकीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित शेती करून विठ्ठल कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र मागील वर्षी झालेल्या दुष्काळामुळे जेमतेम उत्पन्न झाले होते. त्यामुळे तुटपुंज्या उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विचारात विठ्ठल होता. दरम्यान १ जून रोजी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे कसे खरेदी करावे? असा प्रश्न विठ्ठलपुढे उभा ठाकला होता. अखेर निराश झालेल्या विठ्ठलने शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिट्ठी खिशात आढळून आली. त्यामध्ये सततची नापिकी व पेरणीसाठी पैसे नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई व दोन लहान भाऊ असा परिवार आहे. गावातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या