महापौरांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे 243 महिला बचत गटांवरील ‘काळ्या यादी’चे संकट टळले

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील 250पैकी 243 संस्थांवरील ‘काळ्या यादी’चे संकट अखेर टळले आहे. या संस्थांना ‘काळ्या यादी’त टाकण्याची पालिकेने पाठवलेली नोटीस पुन्हा रीतसर चौकशी करून मागे घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यामुळे बचत गटाच्या माध्यमातून कुटुंब चालवणार्‍या हजारो गोरगरीब महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील काही बचत गटांकडे पोषण आहार योजनेतील तांदूळ जमा असल्याच्या तक्रारीवरून पालिका प्रशासनाने धाडसत्र सुरू करून काही बचत गटांच्या स्वयंपाकघरात पाहणी केली. यात काही ठिकाणी बचत गटांकडे शिल्लक राहिलेले आणि बचत झालेले तांदूळ आढळले. मात्र बचत गटांकडून हा तांदूळ विकला जात असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने 250पैकी 243 बचत गटांना सरसकट काळ्या यादीत टाकण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संजय घाडी यांनी आज स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडून बचत गटांवरील अन्यायाला वाचा फोडली. यात पोषण आहार पुरवठा न करणार्‍या संस्थेलाही नोटीस पाठवल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुजाता पाटेकर, किशोरी पेडणेकर, राजूल पटेल, भाजपचे प्रभाकर शिंदे, अभिजित सावंत, राजश्री शिरवडकर, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनीदेखील हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देत महिला बचत गटांवरील अन्यायकारक नोटिसा मागे घेण्याची जोरदार मागणी केली. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने संबंधित प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी केल्यानंतरच कारवाईबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. गोरगरीब महिलांची रोजीरोटी बंद होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असेही जाधव म्हणाले.

गोरगरीब महिलांचा रोजगार हिसकावू नका – महापौर

बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिला कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यास रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन निःपक्षपातीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश महापौर महाडेश्वर यांनी दिले. गोरगरीब महिलांचा रोजगार हिसकावू नका, असेही ते म्हणाले. महापौर दालनात झालेल्या बैठकीला शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, स्थापत्य समिती अध्यक्ष चंद्रशेखर वायंगणकर, नगरसेवक संजय घाडी, सुजाता पाटेकर, सेवा सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षा संजना घाडी आदी उपस्थित होते.