
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून महिन्यापासून मुंबई महापालिकेच्या 25 शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना केंद्रीय बोर्डाच्या शाळांप्रमाणे शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभाग पालिकेच्या 25 शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबविणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक अमेय घोले, पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते. आजचे विद्यार्थी हे शाळा, अभ्यास संपला की विरंगुळ्यासाठी मैदानावर न जाता व्हिडीओ गेम खेळताना दिसतात. हे चित्र बदलण्याची आवश्यकता असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आठवड्यातून एकदा शाळा सुटल्यावर सायंकाळी 7 ते 9 या वेळेत ‘नो इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट डे’ साजरा करण्याचे आवाहन तावडे यांनी विद्यार्थ्यांना केले.
यांनी तयार केला आंतरराष्ट्रीय
बोर्डाचा अभ्यासक्रम
राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम कठीण नाहीय. विषयाच्या मुळापर्यंतची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न या शिक्षण मंडळातून केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, सुलेखनकार अच्युत पालव, स्वरूप संपत, सोनम वांगचुक यांनी केले असल्याचे तावडे यांनी सांगितले.
पालिकेच्या सर्व शाळांमध्ये
दहावीपर्यंतचे शिक्षण
पालिकेच्या सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी तावडे यांनी स्पष्ट केले. महापौरांनी तसा प्रस्ताव तयार केला असून अनुदानासाठी निर्णय घेण्यात वेळ लागत आहे. पालिकेच्या शाळा दहावीपर्यंत झाल्या तर विद्यार्थी गळतीचे प्रमाणही खूप कमी होईल, असेही ते म्हणाले.




























































