
सामना प्रतिनिधी । नगर
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यातील दारु विक्री, मटका, जुगार व अवैध वाळूचोरी करणाऱ्याविरोधात धडक कारवाई करुन विविध 25 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात रोख रक्कम, जुगाराची साधने, मोबाईल, देशी-विदेशी दारु, गावठी हातभट्टीची दारु, वाळू व वाहने असा सुमारे 1 कोटी 11 लाख 44 हजार 156 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 48 जणांना अटक केली. ही कारवाई 24 ते 29 मेदरम्यान करण्यात आली. पारनेर, जामखेड, राहुरी, श्रीरामपूर तालुका, शनिशिंगणापूर, सोनई, नगर तालुका, कर्जत व बेलवंडी या भागात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पारनेर येथील 11 ठिकाणच्या विविध अवैध धंद्यांवर छापा टाकून 10 लाख 88 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अजय सूर्यवंशी, अजित रोहोकले, टकल्या उर्फ आकाश चौधरी, राहुल सालके, महेश बशिले, सतिष सालके, धर्मेंद्र कोला, संदीप फुंदे, अनिल कवाद, गोरख वरखडे, राजू इंदरीकर, दादासाहेब चेमटे, म्हातारबा येडे, अण्णासाहेब म्हस्के, संतोष जगताप, शिवाजी कवडे, सचिन सिनार यांना अटक केली. जामखेड येथील तीन दारुधंद्यावर छापा टाकून 12 हजार 133 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन भागवत उर्फ बबन चव्हाण, जब्बार शेख, रसूल पठाण यांना अटक केली. राहुरी येथे वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर 2 ब्रास वाळूसह पकडून पोलिसांनी 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन विजय माळी, सोपान माने यांना अटक केली. श्रीरामपूर तालुका येथे वाळूची चोरटी वाहतूक करणारे 2 डंपर 4 ब्रास वाळूसह पकडून पोलिसांनी 20 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन राजू शिंदे, किशोर कोळेकर यांना अटक केली. शनिशिंगणापूर येथील चार विविध ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 28 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सद्दम पठाण, चंद्रकांत पाटवकर , नामदेव लष्करे, धनंजय उद्धव पटंगे यांना अटक केली असून यावेळी ज्ञानेश्वर उर्फ पिन्या पतंगे फरार झाला आहे. मनोज अनिल जावळे, विवेक उर्फ सोन्या मोरे, मोहसीन पठाण, ज्ञानेश्वर जाधव उर्फ घुले, गोरक्षनाथ काशीद, ज्ञानेश्वर बोराडे यांना अटक केली आहे. सोनई येथील दारु अड्ड्यावर छापा टाकून 5 हजार 240 रुपयांचा दारुचा अड्डा जप्त करुन अरुण अशोक बेल्हेकर (रा.सोनई, ता.नेवासा) याला अटक केली आहे.
नगर तालुक्यातील दारु अड्डयावर छापा टाकून 3 हजार 173 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सुनिल जगदाळे याला अटक केली. तसेच तालुक्यातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1 हजार 60 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. या कारवाईत सागर अडसूळ, कुणाल कचरे यांना अटक केली आहे. कर्जत येथे वाळुची चोरटी वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 2 ब्रास वाळू पोलिसांनी पकडून 37 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अश्फाक शेख, खंडु दळवी, विशाल वाघमोडे, किरण वाघमोडे, गणेश वीरकर, विजय खरात यांना अटक केली आहे. बेलवंडी येथे वाळूची चोरटी वाहतुक करणारा डंपर, 1 जेसीबी, 1 ट्रॅक्टर व अडीच ब्रास वाळू असा 32 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिसांनी रोहिदास गुंजाळ, सुभाष राठोड यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

























































