
सरकारची कोणतीही परवानगी न घेता काही मुजोर संस्थांचालकांनी अनधिकृतपणे खासगी शाळा सुरूच ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात तब्बल २७ बेकायदा शाळा असून या शाळांची यादी जिल्हा परिषदेने आज जाहीर केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अनधिकृत शाळांपासून सावध रहा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश मान्यताप्राप्त शाळेतच घेण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
ठाण्यात बेकायदा बांधकामापाठोपाठ गेल्या काही वर्षांत अनधिकृत शाळांचे पीक फोफावले आहे. या शाळांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दरवर्षी अनधिकृत शाळांना नोटिसा बजावल्या जातात. पण प्रत्यक्षात कारवाईच्या परीक्षेत शिक्षण विभाग आणि प्रशासन सपशेल ‘नापास’ झाल्याचे दिसून आले आहे. शिक्षण विभाग फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असून दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त 27 बेकायदा शाळा असल्याचे आढळून आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही शाळा बेकायदा इमारतीत तर काही निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत सुरू आहेत.
.. तर पालक जबाबदार
शिक्षण विभागाने दरवर्षीप्रमाणे अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. या शाळांना कायमचे टाळे ठोकण्याबाबत कारवाई न करता उलट प्रवेश घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांवरच राहील, असे सांगून शिक्षण विभागाने आपले हात झटकले आहेत.
शाळांची यादी
अंबरनाथ विभाग : अनिरुद्ध हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (बदलापूर), चैतन्य टेक्नो स्कूल, बदलापूर, नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, (वांगणी), श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्राथमिक (अडीवली भाल).
भिवंडी विभाग : लिओ हायस्कूल (काल्हेर), नॅशनल इंग्लिश स्कूल (दापोडे), श्री. चैतन्य टेक्नो स्कूल (सोनाळे), पाठशाळा कोचिंग क्लास (मिठपाडा), अग्निमाता इंग्लिश स्कूल (पिंपळास), मिन्हाज नॅशनल इंग्लिश स्कूल (गोरसई), सुग्रा बीबी स्कूल (तळवली), द विनर्स इंग्लिश स्कूल (कांबे)
1 बेकायदा शाळा संस्था चालकांकडून राज्य शिक्षण मंडळ, सीबीएससी, आयसीएससी आकर्षक जाहिराती केल्या जातात. त्यामुळे पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.
2 पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी त्या शाळा शासनमान्य आहेत की नाहीत याची खात्री करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
कल्याण विभाग: जी. के. इंग्रजी हायस्कूल (खडवली), चैतन्य टेक्नो स्कूल अनंततम रिजन्सी (डोंबिवली), कमांडर प्रकाश इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज (खडवली), कायधान इंग्लिश स्कूल (कल्याण), ए. पी. एच. स्कूल (खोणी), सिम्बायोसिस स्कूल (कोंढेरी), एस. आर. डी. पी. स्कूल (निबंवली), संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल (निंबवली), सेव्हन स्ट्रीम स्कूल (पिसवली), ओमकार इंग्लिश स्कूल (पिसवली)
शहापूर विभाग: श्री. शारदा इंग्लिश स्कूल (शहापूर), न्यू इंग्लिश स्कूल माऊंड कार्नल स्कूल (तांबडमाळ), एम. जे. वर्ल्ड स्कूल (तांबडमाळ), एम. आर. प्राथमिक विद्यालय (आसनगाव), सौ. भावनादेवी भगवान सांबरे इंटर नॅशनल स्कूल (गोठेघर).




























































