‘मेट्रो’ कारशेडसाठी आरेतील 2700 झाडे कापणार! भाजप, विरोधकांचे झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आरे’तील ‘मेट्रो’ कारशेडसाठी तब्बल 2700 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला आज पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीत मंजुरी मिळाली. यावेळी शिवसेनेने विकासाच्या नावावर होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला जोरदार विरोध केला. मात्र भाजप, राष्ट्रवादीसह न्यायालयाच्या आदेशाने नेमणूक झालेल्या वनस्पतीतज्ञांनीही ‘झाडे तोडण्या’च्या बाजूने मतदान केले, तर काँगेसच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभात्याग केल्याने प्रस्ताव

‘8 विरुद्ध 6’ मतांनी मंजूर झाला.

‘मेट्रो-3’च्या कारशेडसाठी गोरगाव पूर्व ‘आरे’तील तब्बल 2702 झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील 2238 झाडे तोडण्यात येणार असून 464 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला शिवसेनेने वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत जोरदार विरोध केला. ‘मेट्रो’ कारशेडसाठी राज्य शासनानेच नेमलेल्या ‘त्रिसदस्यीय’ समितीने कांजूरमार्ग येथे जागा सुचवली असताना ‘आरे’तील जागेचा अट्टहास का धरला जात आहे, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केला. भूमिगत कारशेड उभारण्याचा पर्याय का वापरला जात नाही, असेही यशवंत जाधव म्हणाले. दरम्यान, या निर्णयामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होणार असल्यामुळे कायदेशीर बाबी तपासून न्यायालयात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही यशवंत जाधव यांनी सांगितले.

असे झाले मतदान

पालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या वृक्ष प्राधिकरणात शिवसेनेचे 6, भाजपचे 4, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि 5 नामनिर्देशित वनस्पतीतज्ञ मिळून एकूण 18 सदस्य आहेत. आज झालेल्या बैठकीत 2 नामनिर्देशित सदस्य गैरहजर राहिले, तर काँग्रेसच्या 2 सदस्यांनी सभात्याग केला. भाजपच्या 4, राष्ट्रवादीच्या 1 आणि 3 नामनिर्देशित सदस्यांनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले. शिवसेनेच्या सहाही सदस्यांनी झाडे तोडण्यास विरोध केला, मात्र हा प्रस्ताव ‘8 विरुद्ध 6 मतांनी मंजूर’ झाला.

विरोधकांची पलटी

‘मेट्रो’ कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र विकास करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेच्या मागणीला यापूर्वी विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला होता. मात्र आज राष्ट्रवादीच्या एका सदस्याने झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले, तर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी ऐन मतदानाच्या वेळी सभात्याग केल्यामुळे झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

56 झाडे वाचवली

कारशेडसाठी झाडे तोडण्याआधी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या पाहणी दौऱ्यात सदस्यांनी काही झाडे वाचवता येतील अशा सूचना केल्या होत्या. 21 ऑगस्टला हा पाहणी दौरा झाला होता. यानुसार 56 झाडे वाचवून गुरुवारी नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवाय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आतापर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात व मुंबईत मिळून 23,846 झाडे लावली असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

15 हजार झाडे लावणार कुठे?

33 हेक्टरवर उभारल्या जाणाऱ्या कारशेडच्या ठिकाणच्या एका झाडाच्या बदल्यात सहा झाडे लावण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र या प्रमाणात झाडे लावायची असल्यास सुमारे 15 हजारांवर झाडे लावावी लागणार आहेत. मात्र ही झाडे लावायला मेट्रो जागा देणार नाही. त्यामुळे पालिका ही झाडे कुठे लावणार, असा सवाल यशवंत जाधव यांनी केला. कारशेड झाल्यास या ठिकाणी असणाऱ्या शेकडो आदिवासींच्या उदरनिर्वाहासाठी पालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.