
‘मुंबई महापालिकेचे खर्चाचे बजेट 70 ते 75 हजार कोटींचे असताना भाजप आणि मिंध्यांच्या सरकारने कॉण्ट्रक्टरची देणी 3 लाख कोटींची करून ठेवली आहेत. ही देणी म्हणजे खोकासुरांनी केलेला 3 लाख कोटींचा घोटाळाच आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीच्या बेबंद कारभाराची चिरफाड केली. ‘घोटाळय़ाचा हाच पैसा निवडणुकीत वापरला जात असल्याची माझी माहिती आहे,’ असा गौप्यस्फोटही उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी शिवसेनेने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडतानाच त्यांनी सत्ताधाऱयांच्या टीकेचाही समाचार घेतला. महापालिकेच्या ठेवी चाटण्यासाठी नसतात असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच केले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली. ‘मुदत ठेवी चाटायला नसतात हे बरोबरच आहे, पण त्या ठेवी कॉण्ट्रक्टरचे बूट चाटून वाटायलाही नसतात’, असा टोला त्यांनी हाणला. ‘जमाखर्चाचा एक ताळमेळ असावा लागतो. आपले उत्पन्न आणि खर्च पाहून प्रकल्पांची आखणी करावी लागते, मात्र मिंधे आणि भाजपने विल्हेवाटच लावण्याचे ठरवले आहे,’ असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
‘मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आम्ही 92 हजार कोटींवर नेऊन दाखवल्या होत्या. त्यापैकी 40 ते 45 हजार कोटी रुपये कामगारांचे पीएफ, ग्रॅच्युईटीसाठी आहेत. उरलेल्या लाँग टर्म आणि मोठय़ा प्रकल्पांसाठी असतात. त्याच पैशातून आम्ही कोस्टल रोड करून दाखवला. सत्ताधारी भाजपवाले गल्लीबोळात काही केलं तरी त्यावर टोल लावतात. आमचा कोस्टल रोड टोलमुक्त आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोस्टल रोडबद्दल बोलताना त्यांनी मुंबई-गोवा हायवेवरून भाजप सरकारला टोला हाणला. ‘नितीन गडकरींचा मुंबई-गोवा हायवे अजून होतोच आहे. 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत असे त्याबाबत सांगितले जात आहे, पण 200 वर्षांत तो होईल की नाही हेच माहीत नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बिनविरोध निवडणूक हा जनतेचा अपमान
‘देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. साम-दाम-दंड-भेद… सगळे सुरू आहे. इतके निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभले नव्हते. कल्याण-डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक घेण्याची जी काही प्रक्रिया राबवली जात आहे हा लोकशाहीचा व जनतेचा अपमान आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांसाठी नवे आर्थिक केंद्र उभारणार
‘मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी मुंबईत वित्तीय केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यांचे मुंबईवर प्रेम होते, मात्र भाजप आल्यावर त्यांनी हे पेंद्र उचलून अहमदाबादला नेले. त्यामुळे ते आता पुन्हा आणण्याऐवजी मुंबईकरांच्या रोजीरोटीसाठी नवे आर्थिक केंद्र आम्ही उभारणार आहोत,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोण? चाटम?
न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी या मुस्लिम व्यक्तीची निवड झाल्याचा दाखला देत मुंबईचे ममदानीकरण होऊ देणार नाही. न्यूयॉर्क होऊ देणार नाही, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले होते. त्याबाबत विचारले असता, कोण बोललं चाटम? कोण? चाटम?,’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
नार्वेकरांनी अधिकाराचा दुरुपयोग केला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘विधानसभा अध्यक्षांना जे काही अधिकार असतात ते सभागृहाच्या आत असतात. सभागृहाबाहेर राहुल नार्वेकर हे फक्त एक आमदार आहेत. हा आमदार अधिकाराचा दुरुपयोग करून जनतेला दमदाटी करत असेल, स्वतः संरक्षणात राहून दुसऱयाचे संरक्षण काढून घेण्याचे आदेश देत असेल तर हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी थांबणार नाही! ‘मुंबई मॉडेल’ पोहोचवणारच!
कोरोना काळात केलेल्या कामांची ‘मुंबई मॉडेल’ नावाची पुस्तिका निवडणूक आयोगाने रोखली आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘त्या पुस्तिकेत आम्ही केलेल्या कामांचा उल्लेख आहे. आमच्या त्या कामाचे, ‘मुंबई मॉडेल’चे जगभरात काwतुक झाले. हे काम आम्ही आयोगाच्या परवानगीने केले नव्हते. त्यामुळे आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणारच. आम्ही थांबणार नाही. ही पुस्तिका बेधडक वाटणार. जे केले आहे ते सांगणार. निवडणूक आयोगाला काय करायचे आहे ते त्यांनी करावे,’ असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
बिनविरोध निवड प्रक्रियाच रद्द करा!
‘बिनविरोध निवडणुकीचा निकाल राखून ठेवणे हे निवडणूक आयोगाचे नाटक आहे. शेवटी ते सत्ताधाऱयांच्याच वळचणीला जाणार हे स्पष्ट आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे संबंधित वॉर्डातील मतदार मतदानापासून वंचित झाले आहेत. पहिल्यांदाच मतदान करू इच्छिणाऱया ‘जेन-झीं’चा मतदानाचा अधिकार नाकारला गेला आहे. त्यामुळे निकाल राखून ठेवण्याला अर्थ नाही. आयोगामध्ये दम असेल तर निर्णय राखून ठेवू नये. अर्ज भरताना डय़ुटीवर जे आरओ होते, त्यांचे कॉल रेकॉर्ड काढा. कोणी कोणी त्यांना फोन केले होते तेही काढा. तसेच त्या वॉर्डातील निवडणूक प्रक्रियाच रद्द करून तिथे पुन्हा निवडणुका घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
हद्दच झाली… शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचेही श्रेय घेताहेत
‘मुंबईत गेल्या 25 वर्षांत आम्ही साधी साधी कामे केली आहेत. तीच कामे आम्ही आज दाखवत आहोत. कोस्टल रोड, मध्य वैतरणा, कोरोना काळातील काम ही सगळी आमची साधी कामे आहेत. भाजप आणि मिंध्यांनी आमच्या या छोटय़ा कामांचे श्रेय घेण्यापेक्षा स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ‘रीगलच्या परिसरात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभा आहे. त्याची जागा निवडण्यापासून, आराखडा तयार करण्यापासून, पुतळा तयार करण्यापासून संपूर्ण खर्च आम्ही केला. त्याचंही श्रेय मिंधे घेत असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘फडणवीस आणि मिंध्यांना कोणी ओळखतही नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडचे प्लॅनिंग, मध्य वैतरणा धरण आणि रुग्णालयांची कामे आम्ही केली आहेत.
- ‘आमचे सरकार गेल्यापासून मराठी माणसाचा पदोपदी अपमान होत आहे. मराठी माणसांना घरे नाकारली जात आहेत. आहारावरून त्याला सुनावले जात आहे. आम्ही काढलेला मराठी सक्तीचा आदेश यांनी बाजूला ठेवला आहे. मराठी भाषा भवनाचे काम थांबले आहे. हे सगळे गेल्या दोन वर्षांत सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढावे लागत आहे.
- मराठी महापौर पदाबाबतच्या अनावश्यक चर्चेवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला झोडपून काढले. ‘आम्ही अस्सल हिंदूच आहोत, पण हिंदू महापौराची भाषा करणारा भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, अशी विचारणा त्यांनी केली. ‘मुंबईसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा दिला गेला, त्यात तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भाजप कुठे होता?
राहुल नार्वेकरांना निलंबित करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा
‘विधानसभेचे अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात. निष्पक्ष कारभार करण्याची त्यांची जबाबदारी असते. अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जात नाहीत, त्यांनी जाता कामा नये असा अलिखित दंडक आहे. त्याला छेद देणारे उद्दाम वर्तन राहुल नार्वेकरांनी केले आहे. त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. सभागृहाबाहेरही नार्वेकर हे स्वतःला ‘नायक’ चित्रपटातले अनिल कपूर समजतात आणि ‘ऑन दि स्पॉट’ आदेश देतात, हा उद्दामपणा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































