कोविशिल्डचा दुसरा डोस आता तीन ते चार महिन्यांनंतरच!

लसींच्या तुटवडय़ामुळे अनेक राज्यांत 18 ते 44 वर्षे वयोगटाच्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागताच केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसचे अंतर पुन्हा वाढवले आहे. आता कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी मिळणार आहे. सरकारने तीन महिन्यांत दुसऱयांदा या लसीच्या डोसमधील अंतर वाढवले. कोविड-19 वार्ंकग ग्रुपने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतल्याचे केंद्राने गुरुवारी जाहीर केले.

सध्या सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोविशिल्ड लसीचे दोन डोस 6 ते 8 आठवडय़ांच्या अंतराने दिले जात आहेत. ब्रिटनच्या आरोग्य नियामक यंत्रणेने तेथे कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये चार महिन्यांपर्यंतचे अंतर ठेवण्यास मान्यता दिली होती. त्याआधारे कोविड-19 वार्ंकग ग्रुपने कोविशिल्डच्या डोसमध्ये चार महिन्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस केली. तथापि, कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतराबाबत कोणताही बदल सुचवलेला नाही. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तज्ञांच्या गटाने कोविड-19 वार्ंकग ग्रुपच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

अंतरवाढीवर काँग्रेसचा निशाणा

केंद्राच्या निर्णयावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. सुरुवातीला दोन डोसमध्ये 4 आठवडय़ांचा फरक होता. नंतर 6 ते 8 आठवडय़ांचा आणि आता 12 ते 16 आठवडय़ांचा. यामागे लसींचा तुटवडा हे कारण आहे की तज्ञांचा सल्ला? मोदी सरकारकडून काही पारदर्शकतेची अपेक्षा करतो, असे ट्विट करीत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जोरदार टोला लगावला.

इतर शिफारसींबाबत निर्णय नाही!

राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने लसीकरणाबाबत इतर काही शिफारसी केल्या आहेत. मात्र सरकारने त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. ज्या लोकांना कोरोना झाला आहे, त्यांना पुढील सहा महिने लस टोचू नये. गर्भवती महिलांना त्यांच्या इच्छेनुसार लस द्यावी आणि स्तनपान करणाऱया महिलाही लस घेऊ शकतात, अशा विविध शिफारसी सल्लागार गटाने केल्या आहेत. मात्र या शिफारसी सरकारच्या मंजुरीनंतरच लागू होतील.

पुढच्या आठवडय़ापासून रशियाच्या स्पुटनिक लसीचे डोस

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगाने लसीकरण वाढविण्याची गरज असताना आता रशियाच्या स्पुटनिक लसीला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने या लसीचा वापर पुढील आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार आहे. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याच दोन लसींद्वारे कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. स्पुटनिकच्या समावेशाने मोहिमेला वेग येण्याची अपेक्षा आहे.

रशियात तयार झालेली स्पुटनिक लस पुढील आठवडय़ात हिंदुस्थानी बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के.पॉल यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून नागरिकांना स्पुटनिक लस टोचली जाणार आहे. तसेच जुलैपासून स्पुटनिकचे देशांतर्गत उत्पादनही सुरू होईल, असे पॉल यांनी सांगितले. स्पुटनिक लस हिंदुस्थानात पोहोचली आहे. पुढील आठवडय़ात ती बाजारपेठेत उपलब्ध होईल, अशी आशा आहे, असे पॉल यांनी म्हटले आहे.

ऑगस्ट ते डिसेंबर आठ प्रकारच्या लसींचे 216 कोटी डोस मिळणार

जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने विविध स्तरांवर काम करीत आहोत. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात 216 कोटी डोस उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनच्या 55 कोटी डोस, कोव्हिशिल्डच्या 75 कोटी डोस, बायो ई सब युनिट लसीचे 30 कोटी डोस, झायडस कॅडिलाचे 5 कोटी डोस, नोवाव्हॅक्सिनचे 20 कोटी डोस, भारत बायोटेकच्या नेझल लसीचे 10 कोटी डोस, जिनोवाचे 6 कोटी डोस आणि स्पुटनिकच्या 15 कोटी डोसचा समावेश असेल, याशिवाय आणखी काही देशांच्या लसी देशात येतील अशीही माहिती पॉल यांनी दिली.

लस तर नाही, मग त्या कॉलरटय़ूनचा त्रास कशाला?

देशात अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प आहे. लसीकरण सुरू नसताना तुम्ही लस घ्या सांगणारी कॉलरटय़ून लावून ठेवली आहे. लसच उपलब्ध नाही तर ती घेणार कोण? कशासाठी ती कॉलरटय़ून लावली आहे? अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला फटकारले.

सरकारने तीन महिन्यांत कोविशिल्डच्याच डोसचे अंतर दोनदा वाढवले. सुरुवातीला या लसीच्या दोन डोसमध्ये 28 ते 42 दिवसांचे अंतर केले होते. नंतर मार्चमध्ये पुन्हा ते अंतर 42 ते 56 दिवसांपर्यंत वाढवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या