विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या ३० शाळा बंद होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक छायाचित्र

सामना ऑनलाईन, मुंबई

इंग्रजी भाषेच्या आकर्षणापायी खासगी शाळांबरोबरच पालिकेच्या भाषिक शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. विद्यार्थीसंख्या शून्यावर आल्यामुळे मुंबईतील तब्बल ३० शाळा दुसऱया शाळांमध्ये विलीन कराव्या लागल्या आहेत. यात मराठी माध्यमाच्या २२ शाळा आहेत. शिक्षण समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

शिक्षण विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षामध्ये कुर्ला, घाटकोपर,  चेंबूर, पवई आणि आसपासच्या परिसरातील मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि तेलुगू माध्यमाच्या १५ शाळांचे अन्य शाळांमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या सोमवारच्या बैठकीत सादर केला होता. त्यात मराठी माध्यमाच्या आठ शाळांचा समावेश आहे. त्याचबरोबर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातही चेंबूर, टेंबीपाडा, पासपोली, गोशाळा मार्ग, मुलुंड, लालबहादूर मार्ग येथील सात मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. तसेच नाना चौक, माझगाव, कामाठीपुरा, वरळी प्रभादेवी भागातील इंग्रजी, मराठी, गुजराती तेलुगू माध्यमाच्या सात शाळांचे अन्य शाळांमध्ये तसेच दादरच्या गोखले रोडवरील एका शाळेचे अन्य शाळेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीपुढे सादर करण्यात आला होता. तब्बल ३० शाळा बंद करून त्या अन्य शाळांमध्ये विलीन कराव्या लागणार आहेत.

बंद झालेल्या शाळा

  • मराठी-२२
  • हिंदी-४
  • गुजराती-५
  • उर्दू-३
  • तेलगू-३
  • कन्नड-१
  • इंग्रजी-२

पटसंख्या वाढवण्याचा प्रयत्न असफल

शाळांच्या विलीनीकरणाचे अनेक प्रस्ताव यापूर्वी शिक्षण समितीमध्ये आले होते, मात्र पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शिवसेनेने वेळोवेळी करून हे प्रस्ताव फेटाळले होते. मात्र आता अगदीच शून्य, दोन अशी पटसंख्या असल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती आजचे कामकाज पाहणाऱया माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिली. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी झोपडपट्टय़ांमध्ये विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांचे मन वळवा, चावडी सभा घेऊन पालिका शाळांबाबत माहिती द्या, तसेच विभागातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या अशा सूचना शिवसेनेने वेळोवेळी केल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.