
पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची तब्बल 31 लाख 70 हजारांची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या भावाला एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून 50 करण्यात आली आहे. सदरची घटना 24 एप्रिलला अहिल्यानगरमध्ये शेंडी बायपास रोडवर घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. सुजित राजेंद्र चौधर असे फरार आरोपीचे नाव आहे. याबाबत श्रेयश लटपटे (वय 23, रा. भायगाव, ता. शेवगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी श्रेयश याने 24 एप्रिल रोजी तो काम करत असलेल्या फर्मचे कारंजा मालेगाव, मेहकर येथील दुकानदारांकडून रोख रकमेचे कलेक्शन करून असे 31 लाख 70 हजारांची रोकड घेऊन ते अहिल्यानगरकडे येत होते. त्यावेळी त्यांचा मित्र सुजित चौधर याचा फोन आला. त्याने फोनवर ‘मला तुझ्याकडे असलेल्या रोकडसोबत रील्स काढायचा आहे,’ असे सांगितले. त्यानुसार सकाळी 9 च्या सुमारास दोघे एमआयडीसी येथील सनफार्मा चौकात भेटले. त्यानंतर मारुती सियान कारमध्ये बसून शेंडी बायपास रोडवर गेले. तेथे गेल्यावर आरोपी सुजित याने श्रेयसला ‘तू समोर उभ्या असलेल्या गाडीतून कॅमेरा घेऊ ये’ असे सांगितले. त्यानुसार श्रेयसने कलेक्शनच्या पैशांची बॅग सियान कारच्या सीटवर ठेवून तो कॅमेरा आणण्यासाठी गेला, त्याचवेळी सुजितने कार सुरू करून रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना या गुन्ह्यात सुजितचा भाऊ अक्षय याचाही सहभाग असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गजाआड केले. त्याच्याकडे सुजितने लुटलेल्या रोकडपैकी 16 लाख 50 हजारांची रोकड मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे.




























































