
सामना ऑनलाईन । धुळे
साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे रविवारी घडलेली घटना दुर्दैवी आहे. सोशल मीडियावर अफवा पसरल्या आणि जमावाने पाच जणांची हत्या केली. या प्रकरणी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप लक्षात घेऊन ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनच फिर्यादी झाले असून अन्य गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत आणि विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख एम. रामकुमार यांनी केले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे साक्री तालुक्यात आश्रयाला आलेल्या सोलापूर जिह्यातील पाच जणांची हत्या झाली. साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडे बाजारात झोळी भरून भिक्षा मिळेल या अपेक्षेने राजू भोसले, भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे आणि आप्पा इंगोले गेले होते, पण त्यांच्यावर मुले पळविण्याचा संशय घेण्यात आला आणि त्यांना जमावाने मारहाण करीत थेट मारून टाकले. या घटनेनंतर पोलिसांनी सोशल मीडियावरील क्लिपचा आधार घेत धरपकड सुरू केली. याविषयी जिल्हा पोलीसप्रमुख एम. रामकुमार यांनी सांगितले की, राईनपाडा घटनेप्रकरणी ३२ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सध्या निरनिराळय़ा ठिकाणी मुले पळविणारी टोळी आली आहे. दरोडा टाकणारे, लुटमार करणारे आले आहेत अशा चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबतचा मजकुर दिला जात आहे. त्यातूनच गैरसमज निर्माण होतात आणि निष्पाप नागरिकांना मारहाण होते. सोशल मीडियावर असा मजकुर टाकू नये. मजकुराच्या विश्वासार्हतेबाबत खातर जमा करावी, असे आवाहन एम. रामकुमार यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेमधील ३२ संशयित आरोपींना कोर्टाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.




























































